'भोलाशंकरांना' अफजल, तोफिक अन् वसीमने दिला खांदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 10:27 AM2020-04-10T10:27:17+5:302020-04-10T10:37:42+5:30

गोदुताई विडी घरकुल माणुसकीचे 'सर्वधर्मीय' दर्शन; व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाइकांनी घेतले आग्र्यातुन अंतिम दर्शन...

Afzal, Tofiq and Wasim gave a shoulder to 'Bholashankar' | 'भोलाशंकरांना' अफजल, तोफिक अन् वसीमने दिला खांदा

'भोलाशंकरांना' अफजल, तोफिक अन् वसीमने दिला खांदा

Next

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात दुहीकरण तसेच फूट पाडण्याचे काम सुरू आहे. अशी परिस्थिती सर्वत्र असताना कुंभारी येथील घरकुल परिसरात एक समाजाभिमुख आणि माणुसकीला दिलासा देणारी मोठी घटना घडली आहे. भोलाशंकर वर्मा नामक व्यक्तीचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे कुटुंबीय आग्रा येथे अडकून आहेत. सध्याच्या आणीबाणी प्रसंगात भोलाशंकर यांच्यावर अंत्यसंस्कार करणार कोण? हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा कोणतीही किंतु-परंतु भावना मनात न ठेवता घरकुल परिसरातील सर्वधर्मीय बांधवांनी शंकर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, विडी घरकुल परिसरातील अफजल पठाण, वसिम देशमुख, मेहबूब मणियार, तोफिक तांबोळी, वसीम तांबोळी नामक माणुसकीच्या हितचिंतकांनी भोलाशंकर यांना खांदा देत त्यांच्यावर हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सोईस्कररित्या अंत्यसंस्कार पार पाडले. आग्रा येथील वर्मा कुटुंबीयांना भोलाशंकरांचे अंतिम दर्शन घेता यावे, याकरिता याच बांधवांनी त्यांच्या व्हाट्सअप व्हिडिओ कॉलवरून संपूर्ण अंत्यसंस्काराचे दर्शन घडविले. आग्र्यातील वर्मा कुटुंबीयांनी शंकर यांना साश्रू नयनांनी अंतिम निरोप दिला.

भोलाशंकर रामलालजी वर्मा ( वय 45, रा- क/705/3, गोदुताई विडी घरकुल) यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते पूर्वी पंधे कंपनीत वाहन चालक होते. काही वर्षापूर्वी त्यांनी पंधे कंपनीची नोकरी सोडून दुसऱ्या खासगी वाहनावर वाहनचालक म्हणून काम सुरू केले. तीन महिन्यांपूर्वी त्यांचा अपघात झाल्यानंतर ते ड्रायव्हिंगचे काम सोडून गोदुताई विडी घरकुल मध्ये कॅन्टींग सुरू केले. ते मूळचे आग्र्यातील आहेत. त्यांची पत्नी मानसादेवी या सोलापूरच्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी आणि मुलगा राजेश वर्मा हे आग्र्याला निघून गेले. शंकर यांना दोन मुली आहेत. त्या विवाहित असून त्याही आग्रा येथे स्थायिक आहेत. मात्र भोलाशंकर हे येथेच थांबून राहिले. चार दिवसांपासून त्यांना त्रास होत असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. शंकर यांना त्यांचे भाऊ यांनी मुखाग्नी दिली.

भोलाशंकर हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच गोदुताई परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांना एक भाऊ आहे. तेही त्यांच्या सोबत राहतात. गरीब असल्याने त्यांच्याकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते. मग मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा कार्यकर्ता वसिम देशमुख यांनी शंकर यांचा अंत्यविधी करण्यासाठी पुढाकार घेतला. ही बाब त्यांनी माजी आमदार नरसय्या आडम यांच्या कानावर घातली. त्यांनीही मदत देऊ केली. त्यानंतर अवघ्या काही तासात 8 हजार 900 रुपये जमा झाले. येथील नागरिकांनी प्रत्येकी दहा रुपये, वीस रुपये, पन्नास रुपये अशी मदत केली. 

पैसे जमा तर मग अंत्यविधीची तयारी करणार कोण?

भोलाशंकर यांच्या अंत्यविधी करिता विडी घरकुल येथील नागरिकांनी मदत देऊ केली. अंत्यविधी खर्चाकरिता पैसे जमा झालेत, पण पुढे अंत्यविधीची तयारी करणार कोण? जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा गोदूताई येथील अफजल पठाण, वसिम देशमुख आणि महबूब मणियार या लोकांनी तिरडी बांधायला सुरुवात केली. वसंत देशमुख यांनी या परिसरातील सारंगी पुरोहित यांना बोलवून हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्याची सुचना केली. हिंदू धार्मिक विधीनुसार भोलाशंकर यांच्यावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. ही सर्व घटना त्यांचे कुटुंबीय वसीम देशमुख यांच्या व्हाट्सअप कॉलद्वारे पहात होते. विशेष म्हणजे अफजल पठाण, वसीम देशमुख, मेहबूब मणियार, तोफिक तांबोळी, वसीम तांबोळी, मल्लिनाथ पाटील, विश्वनाथ ईसरगुंडे बोला शंकर यांना खांदा देत अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत जातीने लक्ष देत राहिले.

Web Title: Afzal, Tofiq and Wasim gave a shoulder to 'Bholashankar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.