सामाजिक, आर्थिक विकासाला चालना देणा-या संशोधनाला विदयापीठांनी प्राधान्य दयावे

By Appasaheb.patil | Published: August 1, 2019 03:46 PM2019-08-01T15:46:06+5:302019-08-01T15:49:15+5:30

नितीनजी गडकरी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाच्या 15 व्या वर्धापन दिन विशेष समारंभ

Academics should give priority to research that promotes social, economic development | सामाजिक, आर्थिक विकासाला चालना देणा-या संशोधनाला विदयापीठांनी प्राधान्य दयावे

सामाजिक, आर्थिक विकासाला चालना देणा-या संशोधनाला विदयापीठांनी प्राधान्य दयावे

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाने हॅण्डलूमच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी या परिसरातील कारागिरांना मदतीला घ्यावे - नितीन गडकरीविदयापीठांमध्ये देशाचे भविष्यातील नागरिक घडत असतात ही बाब लक्षात घेऊन, चांगले नागरिक विदयापीठांनी घडवावेत - नितीन गडकरी

सोलापूर  - ज्या देशांनी यशस्वीपणे ज्ञानाचे रूपांतर संपत्ती मध्ये केले ते देश जगात प्रगतीवर आहेत. ही बाब लक्षात घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील समाजाला उपयोगी ठरतील असे संशोधन प्रकल्प हाती घेऊन या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक विकासाला चालना दयावी असे आवाहन केंद्रीय रस्ते ,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाच्या 15 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 1 आॅगस्ट 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ना. गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या.मंचावर सहकार मंत्री ना.सुभाषबापू देशमुख, सोलापूरच्या महापौर श्रीमती शोभाताई बनशेट्टी , विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त संशोधक आनंद कुंभार, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल, सांगलीचे खा. संजय काका पाटील ,प्र-कुलगुरू एस.आय. पाटील, कुलसचिव प्रा. डा. विकास घुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात पुढे बोलताना ना. गडकरी म्हणाले की, ग्रामीण भागात उच्च शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने विदयापीठांची स्थापना केली जाते. विदयापीठे, महाविदयालये, विदयार्थ्यांची संख्या वाढते आहे, त्याचबरोबर गुणवत्तेत देखील वाढ व्हायला हवी या दृष्टीने सर्व विदयापीठांनी अधिक लक्ष दयायला हवे. विदयापीठांमध्ये देशाचे भविष्यातील नागरिक घडत असतात ही बाब लक्षात घेऊन, चांगले नागरिक विदयापीठांनी घडवावेत.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाने हॅण्डलूमच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी या परिसरातील कारागिरांना मदतीला घ्यावे. त्यांच्या मदतीने निर्यातक्षम वस्तू बनवाव्या, आपल्या विभागातील ज्या उदयोगांना संशोधनाची मदत लागेल त्या उद्योगांना संशोधनाव्दारे मदत दयावी. विदयापीठाच्या कार्यक्षेत्रातील गरिबी, बेरोजगारी दूर करण्याचा या विदयापीठाने प्रयत्न करावा. तरुण विदयार्थ्यांना यासठी संशोधनाची नवी दृष्टी मिळेल असा प्रयत्न विदयापीठाने करायला हवा असेही ना.गडकरी म्हणाले.

नव्या संशोधनामुळे विकासाला चालना देते यासंदर्भात बोलताना ना गडकरी म्हणाले की, साखर कारखान्यात तयार होणाऱ्या इथेनॉलचा उपयोग आतापर्यंत बस किंवा इतर वाहने चालविण्यासाठी आपल्याकडे होतो आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेने जे संशोधन केले आहे त्यातून ब्युटेन हे जैवइंधन तयार करता येऊ शकते व त्यावर विमाने देखील अधिक क्षमतेने चालू शकतात. त्यामुळे अशा जैव इंधनाकडे अधिक लक्ष देणे या पुढच्या काळात गरजेचे आहे. आपला देशात साखरेचे उत्पादन जास्त होते, दुसऱ्या बाजूला इंधन मात्र मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते. जैवइंधनाचे नवीन प्रयोग करून त्याव्दारे आपली इंधनाची गरज पूर्ण व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदयापीठाची प्रगती चांगल्या रितीने होत आहे, यापुढच्या काळातही या विदयापीठाने अशीच प्रगती करावी अशी अपेक्षा व्यक्त करून ना. गडकरी  यांनी व्यक्त केली तसेच जीवनगौरव पुरस्कार विजेते संशोधक आनंद कुंभार यांचे अभिनंदन केले.

प्रारंभी अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विदयापीठाच्या प्रगतीचा आढावा घेताना संगितले की, विदयापीठाने कौशल्य विकासावर, नवीन अभ्यासक्रम व संकुले सुरु करण्यावर भर दिला आहे.परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार, बहुविदयाशाखीय संशोधन प्रकल्प, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम यास प्राधान्य देत विद्यापीठ जोमाने प्रगती करीत आहे.  नवीन इमारतींची कामे होत आहेत, अश्वमेध क्रीडा स्पधेर्चे आयोजन करण्यासाठी तयारी सुरु आहे. यापुढच्या काळात महात्मा बसवेश्वर अध्यासन आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अध्यासन सुरू करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विदयापीठ कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. विशेष पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ , बार्शी यांना देण्यात आला. उत्कृष्ट महाविदयालय पुरस्कार संगमेश्वर महाविदयालय, सोलापूर यास देण्यात आला, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राचार्य सुग्रीव गोरे यांना तर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार डॉ. प्रशांत पवार यांना देण्यात आला. गुणवंत कर्मचारी पुरस्कार शरणप्पा काळे यांना देण्यात आला. तर जीवनगौरव पुरस्काराने आनंद कुंभार यांना गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात इनोव्हेशन, इनक्युबेशन सेंटर च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या लॅब आॅन व्हील्स या उपक्रमाचे तसेच विदयापीठाच्या त्यातले ऍथलेटिक ट्रॅक आणि आरोग्य संकुलाचे उद्घाटन प्रतीकात्मक पद्धतीने ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तेजस्विनी कांबळे आणि प्रा. ममता बोल्ली यांनी केले. कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास विदयापीठ अधिकार मंडळांचे सदस्य, प्राचार्य, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: Academics should give priority to research that promotes social, economic development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.