"पूजा तु कुठे आहेस, १७ वर्षापासून तुला शोधतोय..."; प्रेमवेड्या प्रियकराच्या पत्रानं शहरभर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 14:34 IST2025-12-09T14:33:25+5:302025-12-09T14:34:47+5:30
बिजनौरमध्ये सकाळी फिरायला निघालेल्या लोकांना ही पत्रे सापडली. वाऱ्याने उडून ती विविध ठिकाणी पडलेली आढळली.

"पूजा तु कुठे आहेस, १७ वर्षापासून तुला शोधतोय..."; प्रेमवेड्या प्रियकराच्या पत्रानं शहरभर चर्चा
उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात सध्या एका मनमौजी प्रियकरानं लिहिलेले पत्र व्हायरल होत आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणे आणि गल्लीबोळात या प्रियकराने लिहिलेले पोस्टर चिटकवण्यात आले आहे. इतकेच नाही शहराच्या प्रत्येक चौकात १०-२० पत्रके पडलेली दिसतात. ही सर्व पत्रके लाल शाईने लिहिली आहेत.
या पत्रकावर पूजा नावाच्या मुलीचा उल्लेख करण्यात आला आहे. यात लिहिलंय की, पूजा तु कुठे आहेस, मागील १७ वर्षापासून तुला शोधतोय...त्याशिवाय या प्रियकराने कोर्ट कचेरी, वकील, न्यायाधीश, आयपीएस, आयएएस आणि नेत्यांवरही राग व्यक्त केला आहे. एवढे सर्व असतानाही मला पूजा भेटत नाही असं त्याने म्हटलं आहे. प्रेमात अपयशी ठरलेल्या या प्रियकराचे प्रेम १७ वर्ष जुने आहे. प्रेयसीच्या शोधात तो त्रस्त झालेला आहे. त्यानंतर पत्राच्या माध्यमातून त्याने मनातील राग व्यक्त केल्याचे दिसून येते.
बिजनौरमध्ये सकाळी फिरायला निघालेल्या लोकांना ही पत्रे सापडली. वाऱ्याने उडून ती विविध ठिकाणी पडलेली आढळली. गेल्या ७-८ दिवसांपासून ही पत्रे बिजनौरच्या आवास विकास चौक, नुमैश चौक आणि जज चौकात तसेच गीता नगरी, कलेक्टर ऑफिस कंपाऊंड, विकास भवन कॉम्प्लेक्स, राम का चौराहा, नया बस्ती आणि अगदी रामलीला मैदानात रस्त्यावर पडलेली आढळली आहेत. प्रेयसीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या प्रियकराने लाल शाईने लिहिलेली ही पत्रे चर्चेत आहेत.
दरम्यान, तो कोणीही असो आपल्या प्रेयसीला शोधण्याचा खूप प्रयत्न करत आहे असं इथले स्थानिक रहिवासी सांगतात. प्रियकराचे नाव अरुण असल्याचे समोर आले आहे. तो आधी पत्रे लिहितो आणि नंतर रस्त्यावर फेकतो. बिजनौरमधील या प्रेमवेड्या प्रियकराच्या कृतींमुळे पूजा नावाच्या विवाहित महिलांची चिंता वाढली आहे, कारण त्यांना विविध अफवा ऐकायला मिळत आहेत.