Viral Video : डोक्यावर सिलेंडर अन् खांद्यावर बॅग... 'ती'चे कष्ट पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:09 IST2025-12-09T12:07:36+5:302025-12-09T12:09:08+5:30
अवघ्या २८ सेकंदांच्या या क्लिपमध्ये एक शाळकरी मुलगी ज्या पद्धतीने शिक्षणासोबत कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे, ते पाहून नेटकरी क्षणभर स्तब्ध झाले आहेत.

Viral Video : डोक्यावर सिलेंडर अन् खांद्यावर बॅग... 'ती'चे कष्ट पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!
सध्या इंटरनेटवर एक असा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्याने सोशल मीडियावरील लाखो लोकांचे मन हेलावून टाकले आहे. अवघ्या २८ सेकंदांच्या या क्लिपमध्ये एक शाळकरी मुलगी ज्या पद्धतीने शिक्षणासोबत कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे, ते पाहून नेटकरी क्षणभर स्तब्ध झाले आहेत. "जबाबदारी खरंच वय बघत नाही," हे वाक्य या मुलीच्या संघर्षातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा गरीब कुटुंबातील मुलांच्या संघर्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा व्हिडीओ एका शाळकरी मुलीचा आहे, जी डोक्यावर गॅस सिलेंडर घेऊन शाळेतून घरी परतताना दिसत आहे. एका खांद्यावर शिक्षणाचे आणि दुसऱ्या खांद्यावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे ओझे घेऊन निघालेल्या या लेकी दृढता पाहून संपूर्ण समाज हळहळला आहे. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे याची माहिती नसली तरी, या मुलीचा संघर्ष अनेकांना अंतर्मुख करणारा आहे.
नेमका काय आहे व्हिडीओ?
'dineshwar_0673' नावाच्या एक्स हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक शाळकरी मुलगी डोक्यावर जड गॅस सिलेंडर घेऊन रस्त्यावरून चालली आहे. तिच्या पाठीवर शाळेची बॅग लटकलेली आहे. गर्दीच्या रस्त्यावरून चालतानाही तिच्या चेहऱ्यावर कसलीही धांदल किंवा चिंतेची भावना दिसत नाही, उलट एक प्रकारचे आत्मविश्वासपूर्ण स्थैर्य तिच्या पावलांमध्ये जाणवते.
यावरून स्पष्ट होते की, रोजच्या जीवनातील हा संघर्ष तिच्यासाठी नवीन नाही. जिथे एका बाजूला शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याची धडपड आहे, तिथेच दुसऱ्या बाजूला घरातील चूल पेटवण्याची जबाबदारी ती मोठ्या धीराने उचलत आहे.
जिनको कंधो मे जिम्मेदारी होता है सब मोहमाया खत्म हो जाता है
— dineshwar patel (@dineshwar_0673) December 7, 2025
चाहे लड़का हो या लड़की सबको अपना अपना घर का जिमेदारी निभाना पड़ता है pic.twitter.com/br3y0bgYZx
नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र भावना
हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर येताच त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. हजारो नेटकऱ्यांनी या दृश्यावर दुःख व्यक्त केले असून, अनेकांनी सरकार आणि समाजाच्या व्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एका यूजरने कमेंट केली, "हे चित्र पाहिल्यावर स्पष्ट होते की, आजही देशात गरीबीमुळे अनेक निष्पाप बालकांचे बालपण हिरावले जात आहे. या व्यवस्थेवर लाज वाटते." तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले, "जबाबदारी वय बघत नाही हे खरं, पण समाज आणि सरकारने ते पाहायलाच पाहिजे." एका भावूक नेटकऱ्याने, "कोणत्याही मुलाला असे दिवस पहावे लागू नयेत, हीच देवाजवळ प्रार्थना," अशी इच्छा व्यक्त केली.
दुसरीकडे, काही नेटकऱ्यांनी या मुलीच्या जिद्दीचे आणि संघर्षाचे कौतुक केले आहे. "ही मुलगी म्हणजे विषम परिस्थितीतही हार न मानणाऱ्या लाखो तरुणांचे प्रतीक आहे. तिच्या या धैर्याला माझा सॅल्यूट आहे," अशा शब्दांत एका यूजरने मुलीचे कौतुक केले आहे.