अरेरे! १५ मिनिटं लवकर ऑफिसमध्ये पोहचल्यामुळे तरुणीने गमावली नोकरी, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:43 IST2025-12-09T12:42:10+5:302025-12-09T12:43:03+5:30
एका तरुणीला फक्त दररोज नियोजित वेळेपेक्षा खूप लवकर ऑफिसमध्ये पोहोचल्यामुळे कामावरून काढून टाकण्यात आलं.

अरेरे! १५ मिनिटं लवकर ऑफिसमध्ये पोहचल्यामुळे तरुणीने गमावली नोकरी, नेमकं काय घडलं?
एका स्पॅनिश कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीला फक्त दररोज नियोजित वेळेपेक्षा खूप लवकर ऑफिसमध्ये पोहोचल्यामुळे कामावरून काढून टाकण्यात आलं. तिच्या कॉन्ट्रॅक्टनुसार तिला ७:३० वाजता काम सुरू करायचं होतं, परंतु ती ६:४५ ते ७:०० च्या दरम्यान येत असे. कंपनीला हे वागणं अजिबात आवडलं नाही आणि प्रकरण हळूहळू गंभीर झालं.
रिपोर्टनुसार, महिला इतर कर्मचाऱ्यांच्या आधी काम सुरू करत असे, ज्यामुळे कामाच्या प्रक्रियेत व्यत्यय येत असे. बॉसने सांगितलं की ती इतक्या लवकर आल्यावर तिच्याकडे कोणतंही काम नव्हतं आणि म्हणूनच तिचा वेळ कंपनीसाठी उपयुक्त नव्हता. ही सवय टीम समन्वय आणि वर्क सिस्टमवर परिणाम करत होती, जी कंपनीने एक मोठी समस्या मानली.
२०२३ मध्ये, कंपनीने तिला औपचारिक इशारा दिला. असं असूनही, ती कोणताही बदल न करता दररोज लवकर येत राहिली. कंपनीने असा युक्तिवाद केला की हे नियमांचं उघड उल्लंघन आहे आणि इशारे देऊनही तिच्या वागण्यात सुधारणा झाली नाही, ज्यामुळे प्रकरण आणखी गंभीर झालं. या वर्षाच्या सुरुवातीला, महिलेच्या बॉसने तिला गंभीर गैरवर्तन असल्याचं सांगून कामावरून काढून टाकलं. कंपनीच्या मालकाने म्हटलं की, तिच्या वागणुकीचा कामाच्या ठिकाणी शिस्त, टीमवर्क आणि बॉस-कर्मचारी विश्वासावर नकारात्मक परिणाम होत आहे.
कामावरून काढून टाकल्यानंतर महिलेने सोशल कोर्टात धाव घेतली. तिने असा युक्तिवाद केला की लवकर पोहोचणं ही चूक नव्हती आणि तिला चुकीच्या पद्धतीने काढून टाकण्यात आलं होतं. तिला हे सिद्ध करायचं होतं की लवकर पोहोचणं हे कंपनीविरुद्ध गैरवर्तन मानलं जाऊ शकत नाही. मात्र कोर्टाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.