ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 18:43 IST2025-12-07T18:41:18+5:302025-12-07T18:43:35+5:30
इंजिनिअरची आई कोमात होती, ICU मध्ये मृत्यूशी झुंज देत होती, तरीही कंपनी आणि मॅनेजरने त्या कठीण काळातही काम पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला.

ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
कॉर्पोरेट जग कधीकधी इतकं निर्दयी होतं की, काम खरोखरच व्यक्तीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे का? असा प्रश्न लोक स्वतःलाच विचारू लागतात. सोशल मीडियावर एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची मन हेलावून टाकणारी गोष्ट समोर आली आहे. त्याची पोस्ट व्हायरल होत आहे. इंजिनिअरची आई कोमात होती, ICU मध्ये मृत्यूशी झुंज देत होती, तरीही कंपनी आणि मॅनेजरने त्या कठीण काळातही काम पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला. हॉस्पिटलच्या वेटिंग एरियामध्ये बसून लॅपटॉप उघडण्याच्या सक्तीने लोकांना विचार करायला भाग पाडलं आहे.
इंजिनिअरने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, त्याची आई डायबेटीसमुळे अचानक बेशुद्ध पडली आणि कोमात गेली. याच दरम्यान ऑफिसमध्ये स्प्रिंटचा शेवटचा आठवडा सुरू होता, त्यामुळे काही काम अपूर्ण राहिलं. त्याने दोन दिवसांची सुट्टी घेतली आणि त्याच्या मॅनेजरला परिस्थिती समजावून सांगितली, परंतु तरीही त्याला हॉस्पिटलमधून लॅपटॉप आणून काम करण्यासाठी दबाव आणण्यात आला. त्याने स्पष्ट केलं की, हॉस्पिटलमधील गर्दी, डॉक्टर आणि त्याच्या आईची गंभीर प्रकृती यामध्ये काम करणं अत्यंत कठीण होतं.

उपचारानंतर आईला थोडा आराम वाटला, पण नंतर त्याची आई पुन्हा कोमात गेली. त्याला पुन्हा रुग्णालयात जावं लागलं. मॅनेजरने त्याला सांगितलं की, त्याच्याशिवाय काम थांबेल म्हणून त्याने तेथून कोडिंग करावं. त्याने वेटिंग एरियातून काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मानसिकदृष्ट्या थकला होता. चार दिवस रुग्णालयातून काम केल्यानंतरही तो त्याचं काम पूर्ण करू शकला नाही आणि त्याशिवाय, त्याच्यावर केटी सेशन घेण्याचा दबाव होता. तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकला होता.
इंजिनिअरची पोस्ट आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली, ज्यामुळे मॅनेजर आणि कंपनीची असंवेदनशीलता दिसली. एका युजरने लिहिलं की, "लोक इतके क्रूर कसे असू शकतात? प्लॅनिंग तुमची जबाबदारी नाही." अनेकांनी त्याला मनःशांतीसाठी एचआरकडे तक्रार करण्याचा, मेडिकल लिव्ह घेण्याचा आणि नोकरी बदलण्याचा सल्ला दिला.