अनेकदा आपण वेगळं काहीतरी करण्याच्या विचारता आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्षं करतो. अनेकदा तर आपण आपली कर्तव्यही विसरून जातो. पण आपल्यापैकीच काही माणसं अशी असतात ज्यांना आपल्या कर्तव्याचं भान असतं आणि यातूनचं ते आपला वेगळा मार्ग निवडतात. असचं काहीसं वेगळं पण समाजाशी बांधिलकी असणारं काम मुंबईमध्ये राहणाऱ्या 21 वर्षांच्या एका मुलाने केलं आहे. त्याच्या या कामाची दखल थेट संयुक्त राष्ट्रांनी घेतली असून त्याला UN तर्फे 'V अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, या मुलाने नक्की कोणतं कर्तव्य बजावलं आहे... आणि असं केलयं तरी काय? 

मुंबईत राहणाऱ्या 21 वर्षीय तरूणाने  'दादर बीच' (Dadar Beach) वरून तब्बल एक हजार टन कचरा गोळा केला आहे. त्याच्या याच कारनाम्यामुळे त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. छोट्याशा वयामध्ये एवढा मोठा कारनामा करणाऱ्या या तरूणाचं नाव मल्हार कलाम्बे असं आहे. 

कसा झाला बरं हा चमत्कार?
 
खरं तर ही गोष्ट आताची नाही तर जवळपास दोन वर्षांपूर्वीची आहे. मुंबईतील गजबजलेल्या परिसरात राहणाऱ्या मल्हारने आपल्या मित्रांना एकत्र करून Dadar Beach वर जाऊन तेथील कचरा एकत्र केला. हा कचरा तुम्हा आम्हा सारख्याच लोकांनी समुद्रामध्ये टाकलेला होता. त्यानंतर या कामासाठी मल्हारने 'Beach Please' नावाच्या एका संस्थेची स्थापना केली आणि येथूनच सुरू झाली मल्हारच्या या आगळ्यावेगळ्या कर्तव्यपूर्तीची वाटचाल. संस्था स्थापन केल्यानंतर या संस्थेमार्फत साप्ताहिक स्वच्छता अभियान राबवण्यास त्याने सुरुवात केली.  

मल्हारने याबाबत बोलताना सांगितले की, तो जन्मापासून मुंबईमध्ये राहत आहे. दादरलाच असल्यामुळे त्याचं दादर चौपाटीवर येणं-जाणं असयाचंच. अशातच एक दिवस त्याला आधीची दादर चौपाटी आणि नंतरच्या दादर चौपाटीच्या भयंकर रूपाची जाणीव झाली.  मल्हार आवर्जुन सांगतो की, आपण ज्या शहरात राहतो, त्याला घडवण्याची आणि बिघडवण्याची शक्ती आपल्या म्हणजेच मानवाच्या हातात असते. त्यासाठी आपण प्रत्येकवेळी सरकारी अधिकाऱ्यांना दोष देऊ शकत नाही. 

खरं तर मल्हारला आपल्या या कामातून एक नवीन बदल घडून आणण्याची इच्छा आहे. त्यामुळेच त्याच्या डोक्यात ही 'Beach Please'ची संकल्पना आली. मल्हारने बीच स्वच्छ करण्याची शपथ घेतली होती आणि तेवढ्याच कसोशीने त्याने प्रयत्न करून ती पूर्णदेखील केली. रिपोर्टनुसार, मल्हार आणि त्याच्या साथीदारांनी 87 आठवड्यांमध्ये दादर चौपाटीवरील जवळपास 1000 टन कचरा स्वच्छ केला. त्यानंतर महानगरपालिकेच्या मदतीने हा कचरा डम्पिंग ग्राउंडपर्यंत पोहचवण्यात आला. 

पर्यावरणासाठी मल्हारने केलेलं काम खरचं कौतुकास्पद आहे. त्याच्या याच कामाची दखल घेत UN ने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पुरस्कार देऊन सन्मानित केलं. याव्यतिरिक्त मल्हार आणि त्याची टिम कॉलेज आणि कॉर्पोरेट्स ऑफिसेसमध्ये जाऊन संपर्क साधून त्यांनाही स्वच्छतेसाठी प्रेरित करत आहेत. 

जर तुम्हालाही मल्हारसोबत या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हीही या स्वच्छता अभियानाशी जोडले जाऊ शकता. त्यासाठी +91 91676 60403 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता. 


Web Title: Malhar Kalambe got un award dadar beach waste free india
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.