मेट्रोनं प्रवास करणाऱ्या भारतीय युवकाचं एका व्हायरल फोटोनं आयुष्य पालटलं; जाणून घ्या सत्य काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 13:00 IST2025-12-07T12:58:50+5:302025-12-07T13:00:44+5:30
व्हायरल फोटोत दिसणारी ही मुलगी कुठलीही सामान्य मुलगी नाही तर ती प्रसिद्ध टीव्ही सीरीज गेम ऑफ थ्रोन्सची मुख्य अभिनेत्री मेसी विलियम्स आहे असा दावा करण्यात येत आहे

मेट्रोनं प्रवास करणाऱ्या भारतीय युवकाचं एका व्हायरल फोटोनं आयुष्य पालटलं; जाणून घ्या सत्य काय?
कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन उभं राहते जिथं एक सामान्य घटनाही संपूर्ण भविष्य बदलण्याची ताकद ठेवते. सोशल मीडियावर सध्या एक फोटो खूपच व्हायरल होत आहे त्यातून नियतीचा खेळ कसा असतो हे दिसून आले. या फोटोत एक त्रस्त, चिंतेत आणि थकलेला भारतीय तरूण मेट्रोने प्रवास करताना दिसतो. त्याच्या शेजारी एक सुंदर मुलगी बसली आहे, तिच्याबद्दल त्याला काहीच माहिती नाही. तो तिला ओळखतही नव्हता.
संपूर्ण जर्मनीत व्हायरल फोटोची चर्चा
व्हायरल फोटोत दिसणारी ही मुलगी कुठलीही सामान्य मुलगी नाही तर ती प्रसिद्ध टीव्ही सीरीज गेम ऑफ थ्रोन्सची मुख्य अभिनेत्री मेसी विलियम्स आहे असा दावा करण्यात येत आहे. मेट्रो प्रवासावेळी एकाने हा फोटो काढला आणि तो पाहता पाहता पूर्ण जर्मनीत व्हायरल झाला. सर्वच पत्रकार हा तरूण कोण हे शोधत होते. त्यात प्रसिद्ध डेर स्पीगलनेही या फोटोत दिसणाऱ्या युवकाचा शोध सुरू केला. अखेर त्यांचा शोध म्यूनिख येथे जाऊन संपला. हा भारतीय युवक बेकायदेशीरपणे जर्मनीत राहत होता. ना त्याच्याकडे वैध परवाना होता ना खिशात युरो होते. तो रोज ट्रेनने घाबरत घाबरत प्रवास करायचा. आयुष्य भीतीच्या सावटाखाली तो जगत होता असं कहाणीत सांगण्यात आले.
या युवकाचा शोध घेत जेव्हा पत्रकार त्याच्याकडे पोहचले, तेव्हा त्यांनी त्याला तुझ्या शेजारी बसलेली युवती कोण होती हे माहिती होते का असं विचारले. तेव्हा या युवकाने शांतपणे प्रामाणिक उत्तर दिले. तो म्हणाला की, जेव्हा एखाद्या माणसाच्या डोक्यावर छत नसते, खिशात पैसे नसतात, प्रत्येक दिवशी कुणीतरी पकडेल अशी भीती असते तेव्हा आपल्या शेजारी कोण बसलंय याचा काही फरक पडत नाही असं युवकाने सांगितले. त्याचे हे उत्तर ऐकून आणि त्याच्या परिस्थितीने प्रभावित होऊन मॅगझिनने त्याला पोस्टमॅनची नोकरी ऑफर केली. ८०० युरो महिना सॅलरीसोबत त्याला जॉब कॉन्ट्रॅक्ट दिले गेले ज्यामुळे त्याला जर्मनीत कायदेशीरपणे राहण्याचा परवानाही मिळाला. एका व्हायरल फोटोने या युवकाचे आयुष्यच पालटलं असा दावा सोशल मीडिया पोस्टवर करण्यात आला.
क़िस्मत जब पलटती है तो एक आम सा लम्हा भी इंसान की पूरी ज़िंदगी बदल देता हैं।
— Shagufta khan (@Digital_khan01) December 6, 2025
ये कहानी हमें याद दिलाती है के रिज़क कब और कहाँ से आएगा इसका किसी को कोई इल्म नहीं है।
अहम बात ये है के मुसीबत को ख़ुद पर ग़ालिब ना आने दें, मायूस न हो। आपका मौका कभी न कभी ज़रूर आएगा। इसलिए अपने… pic.twitter.com/FP4U8J27Kh
फोटोमागे सत्य काय?
दरम्यान, अनेक फॅक्ट चेकर्सने या व्हायरल फोटोची पडताळणी केली. ज्यात हा फोटो जर्मनी मेट्रोमधील नसून लंडनशी संबंधित असल्याचं सांगितले आहे. तसेच हा फोटो २०२५ मधला नसून २०१९ मधला असल्याचे सांगण्यात येते. त्याशिवाय डेर स्पीगल वेबसाईटवर या बातमीचा कुठलाही पुरावा नाही. सोशल मीडियात व्हायरल होणारी कहाणी प्रेरणादायी असली तरी ती खरी नाही. ग्रोक एआयनेदेखील या घटनांचा तपशील नाकारलेला आहे. ही कथा बनावट असून या फोटोतील व्हायरल मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री नाही असंही फॅक्ट चेकर्सने सांगितले.
या व्हायरल फोटोत मुलगी हसत, रिलॅक्स मूडमध्ये दिसते तर मुलगा थोडा गंभीर आणि शांत दिसतो. दोघांमध्ये कुठलाही संवाद नाही हे दिसून येते. ही मुलगी जर्मनीतील सामान्य विद्यार्थिनी असल्याचं सांगितले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय फॅक्ट चेक वेबसाईट्सने सोशल मीडियात व्हायरल होणारा दावा खोटा ठरवला आहे. या व्हायरल फोटोमुळे मुलाचे आयुष्य बदलले, त्याला नोकरी मिळाली याचे पुरावे नाहीत. दोन भिन्न संस्कृतीचे लोक चेहऱ्यावर स्मित हास्य असणारी मुलगी आणि गंभीर चिंतेत असणारा हा युवक त्यामुळे हा फोटो व्हायरल झाला. त्यावर बरीच कहाणी लोकांनी बनवली. त्यामुळे हा फोटो खरा असला तरी त्यामागची कहाणी बनावट असल्याचे फॅक्ट चेकर्सने सांगितले.