हवाईत जगातील सर्वात घातक ज्वालामुखीचा उद्रेक, 400 मीटर उंच लावा उसळला; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 16:16 IST2025-12-07T16:14:07+5:302025-12-07T16:16:17+5:30
Hawaii Volcano Eruption: जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या किलौआ येथे अचानक उद्रेक झाला.

हवाईत जगातील सर्वात घातक ज्वालामुखीचा उद्रेक, 400 मीटर उंच लावा उसळला; पाहा VIDEO
Hawaii Volcano Eruption: जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुख्यांपैकी एक मानला जाणारा हवाईमधील कीलाउआ पुन्हा एकदा भडकला आहे. ज्वालामुखीतून तब्बल 400 मीटर (1300 फूट) उंच लाव्हा आणि धुराचे फवारे उसळताना दिसले. या भीषण दृश्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, वैज्ञानिकांनी याला अलिकडच्या दशकातील सर्वात तीव्र ज्वालामुखी उद्रेकांपैकी एक म्हटले आहे.
पहाटेपासून विध्वंसक उद्रेक...
अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण (USGS) ने रविवारी पहाटे जाहीर केले की, कीलाउआच्या हलंमाउमाउ क्रेटरमध्ये प्रचंड उद्रेक सुरू झाला आहे. या वेळी क्रेटरच्या आत तिन्ही दिशांनी समान उंचीपर्यंत तीन लाव्हा फव्वारे उडताना दिसत आहेत. हा कीलाउआच्या इतिहासातदेखील फार दुर्मिळ क्षण आहे.
आकाश लाल झाले...
स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 11:45 च्या सुमारास उद्रेक सुरू झाला. काही मिनिटांतच आकाश लाव्हारसामुळे पूर्णपणे लाल झाले. सध्या लावा क्रेटरच्या आतच मर्यादित असून हवाई व्होल्केनोज नॅशनल पार्कच्या बाहेरील परिसराला तत्काळ कोणताही धोका नाही. उद्रेकाचा भाग असलेला पार्क परिसर आधीच बंद करण्यात आला आहे.
🌋A volcano has awakened in Hawaii — Kīlauea is erupting with a rare phenomenon
— NEXTA (@nexta_tv) December 7, 2025
Three nearly identical lava fountains are erupting at the same time, each reaching almost 400 meters in height. pic.twitter.com/DV5wQ0Qc1p
असामान्य दृश्य...
USGS हवाई वोल्केनो ऑब्झर्वेटरीचे प्रमुख वैज्ञानिक केन होन म्हणाले, हा अत्यंत दुर्मीळ आणि असामान्य उद्रेक आहे. तीनही फव्वारे एकाच उंचीवर उसळताना पाहणे म्हणजे निसर्गाची प्रचंड शक्ती अनुभवण्यासारखे आहे. सध्या कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान नोंदले गेलेले नाही. आसपासच्या भागात हलकी राख पडण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
2018 चा उद्रेक अजूनही आठवणीत
2018 मध्येही कीलाउआचा प्रचंड उद्रेक झाला होता आणि त्यात शेकडो घरे उद्ध्वस्त झाली होती. मात्र या वेळचा उद्रेक सध्या क्रेटरपुरता मर्यादीत आहे. तरीही वैज्ञानिक 24 तास निगराणी ठेवत आहेत. हवाई पर्यटन विभागाने सांगितले की, ही घटना जगभरातील पर्यटकांसाठी दुर्मिळ संधी असली तरी सुरक्षा नियमांचे कठोर पालन आवश्यक आहे. पार्कच्या बंद भागात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे.
सोशल मीडियावर #KilaueaEruption ट्रेंड
सोशल मीडियावर कीलाउआचा उद्रेक चांगलाच ट्रेंड होत आहे. लोक ड्रोन फुटेज आणि दूरबिणीतून घेतलेले व्हिडिओ पोस्ट करत आहेत, ज्यात तीन प्रचंड लाव्हाचे स्तंभ आकाश उसळताना दिसतात.