रुग्णसेवा प्रथम...लग्न मांडवातच डॉक्टर नववधूकडून महिलेवर उपचार; कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:49 IST2025-12-02T18:49:25+5:302025-12-02T18:49:46+5:30
कोल्हापूर : पन्हाळ्याच्या पायथ्याला एका फार्महाऊसमध्ये लग्न मांडवात अक्षता पडताच चक्कर येऊन पडलेल्या महिलेवर डॉक्टर नववधूने उपचार केले. वेळीच ...

रुग्णसेवा प्रथम...लग्न मांडवातच डॉक्टर नववधूकडून महिलेवर उपचार; कोल्हापुरातील घटना
कोल्हापूर : पन्हाळ्याच्या पायथ्याला एका फार्महाऊसमध्ये लग्न मांडवात अक्षता पडताच चक्कर येऊन पडलेल्या महिलेवर डॉक्टर नववधूने उपचार केले. वेळीच केलेल्या उपचारामुळे महिलेला धीर मिळाला. ‘कर्तव्य प्रथम’ असे म्हणत नववधू डॉ. प्रिया भारती-बुवा यांनी दाखवलेल्या कर्तव्य तत्परतेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या उपचाराचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी बोरगाव येथील अभियंता रोहित बुवा आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथील डॉ. प्रिया भारती यांचा विवाह रविवारी (दि. ३०) पन्हाळ्याच्या पायथ्याशी एका फार्महाऊसमध्ये झाला. अक्षता संपताच स्टेजवर एक महिला चक्कर येऊन कोसळली. हा प्रकार घडताच नातेवाईक, पै-पाहुणे यांची घाबरगुंडी उडाली. मात्र, प्रसंगावधान राखत डॉ. प्रिया यांनी तातडीने महिलेवर प्रथमोपचार सुरू केले. काही वेळातच महिला शुद्धीवर आली.
सकाळपासून झालेली दगदग आणि उपाशीपोटी असल्याने त्यांना चक्कर आली होती. त्यांना तातडीने जेवण करून आराम करण्याचा सल्ला डॉ. प्रिया यांनी दिला. कपाळाला मुंडावळ्या बांधलेल्या नववधूने स्टेजवरच केलेल्या उपचाराचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी डॉ. प्रिया यांचे कौतुक केले.
नातेवाईकांना अभिमान
पै-पाहुण्यांकडून नवदाम्पत्य शुभेच्छा स्वीकारत असतानाच अचानक एक महिला चक्कर येऊन पडल्याने गोंधळ उडाला होता. मात्र, डॉ. प्रिया यांनी ‘कर्तव्य प्रथम’ असे म्हणत महिलेवर उपचार केले. त्यांच्या या कर्तव्यतत्परतेबद्दल नातेेवाईकांनी अभिमान व्यक्त केला. तसेच चक्कर येऊन पडलेल्या महिलेने आभार मानले.