असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 13:25 IST2025-12-02T13:24:05+5:302025-12-02T13:25:27+5:30
एका भारतीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर खुलासा केला आहे.

असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
एका भारतीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर खुलासा केला की, त्याच्या आजीला उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं, त्यामुळे तो ढसाढसा रडत होता. पण त्यानंतर असं काही झालं ज्यामुळे त्याला ऑफिस सोडावसं वाटलं. कर्मचारी आधीच लॉग इन करून वर्क फ्रॉम होम करत होता, परंतु रात्री ९ वाजता रुटीन मीटिंग मिस झाली. कंपनीच्या डायरेक्टरने संतापून एचआरला एक दिवसाचा पगार कापण्याचा आदेश दिला, ज्यामुळे ऑफिस कल्चर आणि असंवेदनशीलतेबद्दल ऑनलाईन मोठी चर्चा सुरू झाली.
कर्मचाऱ्याने स्पष्ट केलं की त्याने जाण्यापूर्वी एका सहकाऱ्याला याबाबत माहिती दिली होती, परंतु मॅनेजमेंटला सांगण्यास विसरला. याच दरम्यान, तो रुग्णालयात असताना, कंपनी़ डायरेक्टर फोनवर त्याच्यावर ओरडू लागला. आधीच मानसिक तणावाखाली असलेला कर्मचारी उत्तर देऊ शकला नाही. काही दिवसांनी, त्याच कर्मचाऱ्याला १६.५ तासांच्या शिफ्टमध्ये काम करायला लावण्यात आलं.

थकलेल्या कर्मचाऱ्याने मॅनेजमेंटला एक ईमेल लिहिला, ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की जर या १६.५ तासांची शिफ्ट मिस झालेल्या दिवसाची भरपाई करत नाही, तर तो कोणत्याही परिस्थितीत त्याच्या शिफ्टपेक्षा जास्त वेळ काम करणार नाही. या ईमेलने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं. ईमेल पाठवल्यानंतर, एचआरने कर्मचाऱ्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की ही एक किरकोळ बाब आहे आणि त्याने यावर रागावू नये.
कर्मचाऱ्याने स्पष्ट केलं की तो सध्या नोकरी सोडू शकत नाही कारण त्याने बॉन्डवर सही केली आहे. त्याने फक्त आवश्यक तेवढेच काम करण्याचा आणि उर्वरित वेळ त्याच्या स्किल्सवर फोकस करण्याचा निर्णय घेतला होता. पोस्ट व्हायरल होताच, लोक कर्मचाऱ्याला सपोर्ट करत आहेत. अनेकांनी त्याच्या धाडसाचं कौतुक केलं.