Video: मालवणात मध्यरात्री हायव्हॉल्टेज ड्रामा; भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये सापडली लाखोंची रोकड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 08:03 IST2025-12-02T08:02:08+5:302025-12-02T08:03:07+5:30
पोलीस आणि भाजपा पदाधिकारी यांच्यात कार सोडून देण्याबाबत चर्चा झाली. त्याची माहिती शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना माहिती दिली. माहिती मिळताच निलेश राणे रात्री १ वाजता मालवण पोलीस ठाण्यात पोहचले.

Video: मालवणात मध्यरात्री हायव्हॉल्टेज ड्रामा; भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये सापडली लाखोंची रोकड?
सिंधुदुर्ग - राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. मात्र मतदानाच्या आदल्या रात्री मालवणात हाईव्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. याठिकाणी भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये लाखोंची रोकड सापडल्याचा आरोप आहे. मालवण पिंपळपारमध्ये तपासणीवेळी कारमध्ये दीड लाखांची रोकड सापडली. शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी रात्री १ वाजता मालवण पोलीस स्टेशन गाठत हा प्रकार समोर आणला. देवगड येथील भाजपा पदाधिकाऱ्याची ही कार असल्याचं समोर आले आहे. विशेष म्हणजे या कारला नंबरप्लेटही लावण्यात आली नव्हती हे निदर्शनास आले.
मालवण पिंपळपार येथे तपासणी सुरू होती. त्यावेळी भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये रोकड सापडली. पोलीस आणि भाजपा पदाधिकारी यांच्यात कार सोडून देण्याबाबत चर्चा झाली. त्याची माहिती शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना माहिती दिली. माहिती मिळताच निलेश राणे रात्री १ वाजता मालवण पोलीस ठाण्यात पोहचले. ठोस कारवाई केल्याशिवाय पोलीस स्टेशनमधून जाणार नाही अशी भूमिका आमदार निलेश राणे यांनी घेतली. याआधी भाजपा पदाधिकारी विजय केनवडेकरांच्या घरी जाऊन निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यावेळी पैशाने भरलेली बॅग त्यांच्या घरात सापडली होती. त्यानंतर यावरून भाजपा आणि शिंदेसेनेत संघर्ष झाल्याचं पाहायला मिळाले. यात घरात बेकायदेशीरपणे शिरकाव केल्याचा ठपका ठेवत निलेश राणेंवरच गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मालवण पोलीस स्टेशनात निलेश राणे यांनी पोलिसांसोबत संवाद साधला. त्यात निवडणूक अधिकाऱ्याने कारमध्ये काही आक्षेपार्ह नसल्याचं सांगितले, मात्र त्या कारला नंबर नव्हता. कारमध्ये भाजपाचे स्कार्फ सापडला आहे. कारवाई होणार मात्र ती माझ्यावर करणार. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याचा गुन्हा माझ्यावर टाकला. मी एका घरात होतो. सार्वजनिक ठिकाण नव्हते. माझं काय चुकतंय ते सांगा. आमच्या पोलिसांकडे अपेक्षा आहे. २ दिवसांपूर्वी माझा अपेक्षाभंग झाला आहे. भाजपा पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर ७-८ गाड्या होत्या. आम्ही पोलिसांना सांगितले, मात्र कारवाई झाली नाही असा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला.
दरम्यान, अलीकडेच भाजपा आणि शिंदेसेना यांच्यातील संघर्ष वाढला आहे. त्यात सिंधुदुर्गात निलेश राणेंकडून सातत्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर बोचरी टीका करण्यात येत आहे. त्यात भाजपा नेते आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी निलेश राणेंना बळीचा बकरा बनवले जात आहे असा आरोप केला. मात्र मालवण येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांचं कौतुक करत शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचं जाहीर सांगितले. कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा, शिवसेनेला कोकणात सापडला आहे हिरा. पोटात एक ओठात एक मला जमत नाही. जो काम करतो त्याच्या पाठिशी उभे राहणारा एकनाथ शिंदे आहे. निलेश राणे केव्हा घाबरत नाही. नारायण राणे यांचे बाळकडू त्याला मिळाले आहे. इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे करेगा, कुणी कितीही करा कल्ला मालवण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचं शिंदे म्हणाले होते.