खचलेल्या रस्त्यावरून वाहतूक, आंबोली घाटातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 06:07 PM2019-09-03T18:07:37+5:302019-09-03T18:09:30+5:30

बावीस दिवसांनंतर चार दिवसांपूर्वी आंबोली घाटातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत मुख्य धबधब्याजवळ खचलेला रस्ता दुरुस्त करण्यात बांधकाम विभागाला यश आले नसल्याने बांधकाम विभागाने येथून एकेरी वाहतूक सुरू करावी, असे पोलीस प्रशासनाला सुचविले.

Traffic from the paved road, type in Amboli Ghats | खचलेल्या रस्त्यावरून वाहतूक, आंबोली घाटातील प्रकार

खचलेल्या रस्त्यावरून वाहतूक, आंबोली घाटातील प्रकार

Next
ठळक मुद्देखचलेल्या रस्त्यावरून वाहतूक, आंबोली घाटातील प्रकार बांधकाम विभागाने हात झटकले, पोलिसांनी योग्य खबरदारी घेण्याची गरज

सावंतवाडी : बावीस दिवसांनंतर चार दिवसांपूर्वी आंबोली घाटातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत मुख्य धबधब्याजवळ खचलेला रस्ता दुरुस्त करण्यात बांधकाम विभागाला यश आले नसल्याने बांधकाम विभागाने येथून एकेरी वाहतूक सुरू करावी, असे पोलीस प्रशासनाला सुचविले.

पण बांधकाम विभागाचे आदेशच पोलिसांनी धाब्यावर बसवित खचलेल्या ठिकाणावरून दुहेरी वाहतूक सुरू केल्याने हे अपघातास निमंत्रण देण्यासारखे आहे. यावर मात्र बांधकाम विभागाने हात झटकले असून पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबोली घाटरस्ता खचला होता. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सुरुवातीला आंबोली घाटातून दिवसाची वाहतूक सुरू ठेवावी असे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यानंतर घाटाचे काही अंशी काम पूर्ण झाल्यानंतर छोटी वाहने दिवस-रात्र सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. तर अलीकडेच गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आंबोली घाटातून एसटी वाहतूक सुरू करण्यासही परवानगी दिली आहे.

मात्र, ही वाहतूक सुरू करीत असताना बांधकाम विभागाने पोलीस प्रशासनास पत्र लिहून व पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत मुख्य धबधब्याजवळ रस्ता खचला आहे त्या रस्त्याच्या बाजूने दुहेरी वाहतूक सुरू केली तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू करावी असे सांगितले होते. तसेच तेथे पोलीसही ठेवण्याची सूचना केली होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आंबोली घाटातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती.

आंबोली घाट हा वाहतुकीसाठी सुरक्षित घाट म्हणून ओळखला जायचा. मात्र, पाच वर्षांपूर्वी याठिकाणी मोठी दरड कोसळली आणि घाटरस्ता बंद पडला होता. त्यानंतर अलीकडच्या पावसाळ्यातही घाटातील धबधब्याकडील काही भागही कोसळला होता. त्यामुळे आता पुन्हा घाट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

रात्रीच्या वाहतुकीवर नियंत्रण नाही

दिवसाचा एक पोलीस या घाटातून वाहतूक सुरळीत करीत होता. तर सायंकाळच्या वेळी पोलिसच नसल्याने आंबोली घाटातून मुख्य धबधब्यासमोरून दुहेरी वाहतूक सुरू होती. कोणाचे नियंत्रणही या वाहतुकीवर नव्हते.

त्यातच मुख्य धबधबा असल्याने अनेकजण धबधब्यासमोर आपल्या गाड्या लावून फोटोसेशनही करीत होते. यामुळे अपघात होऊ शकतो याची थोडीही जाणीव या वाहतूकदारांना नव्हती.

त्यातच धबधब्यासमोर पोलीस नसल्याने या हौशी पर्यटकांना नियंत्रणात आणणेही कठीण होत होते. त्यामुळे पोलिसांनी गणेशोत्सवाच्या काळात तरी याठिकाणी थांबून वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी आंबोलीवासीयांकडून होत आहे.

Web Title: Traffic from the paved road, type in Amboli Ghats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.