Tourist breaks in Malwa: Boat transport, scuba diving, snorkeling and other water sports | मालवणात पर्यटनाला ब्रेक : होडी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडा प्रकार बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ला होडी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने मालवण बंदरात बोटी तळ ठोकून आहेत.

मालवण : ह्यकोरोनाह्णचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किल्ले प्रवासी होडी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडा प्रकार पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. किनारपट्टी भागातील पर्यटन ठप्प झाले आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांनीही आपले व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखोंची उलाढाल थांबली आहे. कोरोनाचा मोठा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसला आहे.

जिल्ह्याची पर्यटन राजधानी म्हणून मालवणकडे पाहिले जाते. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून येथील पर्यटन व्यवसाय अवकाळी पाऊस, चक्रीवादळे यांसारख्या समस्यांमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यात आता भर पडली आहे ती कोरोना व्हायरसची.

गणेशोत्सव, दिवाळीचा हंगाम कोरडाच गेल्याने उन्हाळी सुटीतील पर्यटनाचा हंगाम बहरेल आणि झालेले नुकसान भरून काढता येईल अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिकांना होती. मात्र, कोरोना व्हायरसमुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे.
उन्हाळी सुटीच्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे दाखल होत असल्याने त्यादृष्टीने पर्यटन व्यावसायिकांनी नियोजन केले होते. मात्र, सर्व पर्यटन व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केल्याने याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे. भविष्याचा विचार करता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे अत्यावश्यक असल्याने याचा गांभीर्याने विचार करीत शहरासह किनारपट्टी भागातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी स्वत:हून पुढाकार घेत आपले व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास येणाऱ्या अनेक पर्यटकांनी आपली रिसॉर्ट, लॉजिंगची केलेली आरक्षणे रद्द केली आहेत. यामुळे पर्यटन व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षीचा पर्यटन हंगामही धोक्यात आला असून पर्यटन व्यावसायिकांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जलक्रीडा प्रकार, किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा, आठवडा बाजार पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे एरव्ही गजबजलेली बंदरजेटी मंगळवारी ओस पडल्याचे चित्र होते.
पर्यटन व्यवसायावर मोठे संकट कोरोनामुळे पर्यटन व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणेही महत्त्वाचे असल्याने त्यादृष्टीने पर्यटन व्यावसायिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत पर्यटन व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे येत्या एप्रिल महिन्यापर्यंत जिल्ह्यात अशीच परिस्थिती राहील अशी चिन्हे आहेत.

प्रवासी होड्या किना-यावर उभ्या, पर्यटकांची संख्याही रोडावली
प्रवासी होड्या किना-यावर उभ्या करून ठेवल्या होत्या. गोव्यातील कॅसिनो, हॉटेल्स बंद केल्याने गेले दोन, तीन दिवस गोव्याकडे जाणारे पर्यटक येथे दाखल होत होते. त्यामुळे सतर्कतेच्या दृष्टीकोनातून परराज्यातून, विदेशातून येणाºया पर्यटकांची ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात येत होती. मात्र, मंगळवारपासून सर्व पर्यटन व्यवसाय बंद असल्याने येथे येणा-या पर्यटकांची संख्याही रोडावल्याचे दिसून आले.

 

Web Title: Tourist breaks in Malwa: Boat transport, scuba diving, snorkeling and other water sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.