'कणकवली पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन अधिकृत की अनधिकृत?'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 04:29 PM2021-12-08T16:29:01+5:302021-12-08T16:32:13+5:30

कणकवली पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा विषय चर्चेचा ठरला.

Subject of inauguration of new building in the general meeting of Kankavali Panchayat Samiti | 'कणकवली पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन अधिकृत की अनधिकृत?'

'कणकवली पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन अधिकृत की अनधिकृत?'

googlenewsNext

कणकवली : कणकवली पंचायत समितीच्या नूतन इमारतीत प्रथमच सर्वसाधारण सभा होत आहे. पण या इमारतीचे उद्घाटन अधिकृतपणे झाले की अनधिकृतपणे ? याचे उत्तर प्रभारी गटविकास अधिकारी यांनी द्यावे. अशी मागणी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत यांनी केली. त्यामुळे सभागृहातील अधिकारी काहीसे गोंधळले.

मात्र, या उद्घाटनाबाबत सभेत ठराव घेतला होता. हे तुम्हाला माहीत नाही का ? तुम्ही किंवा इतर काही लोकांनी जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या उद्घाटनाबाबत  पत्र दिले आहे ना? असा प्रतिप्रश्न सभापती मनोज रावराणे यांनी केला. तसेच त्याबाबत आम्हाला खुलासा विचारला जाईल तेव्हा त्याचे निश्चितपणे उत्तर देऊ. असे सांगत या मुद्यांवरील चर्चेवर पडदा टाकला. कणकवली पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा विषय चर्चेचा ठरला.

आज, बुधवारी परमहंस भालचंद्र महाराज सभागृहात सभापती मनोज रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यावेळी उपसभापती प्रकाश पारकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अभिजित हजारे, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, सुजाता हळदिवे, हर्षदा वाळके, मंगेश सावंत, महेश लाड, मिलींद मेस्त्री, दिव्या पेडणेकर,गणेश तांबे यांच्यासह अन्य पंचायत समिती सदस्य व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

नवीन इमारत उदघाटनाचा मुद्दा मंगेश सावंत यांनी उपस्थित केल्याने सुरुवातीपासून शांततेत चाललेल्या या सभेतील वातावरण बदलले. याबाबत काय उत्तर द्यायचे असा प्रश्न सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना पडलेला असतानाच सभापती रावराणे यांनी उत्तर दिल्याने. त्या मुद्यावर पडदा पडला. या सभेत १५ वा वित्त आयोग व अन्य विषयावर चर्चा झाली. आरोग्य विभागाच्या चाललेल्या कामांबाबत माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी दिली. एमआरजीएस योजनेतील काम करताना दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सुजाता हळदिवे यांनी केला. त्यावर गुरांचे गोठे व अन्य कामे चालू आहेत. निधीची कमतरता असल्याने कामात अडथळे येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजनेनंतर्गत  घरांची यादी कोणती असणार आहे ? असा प्रश्न सदस्यांनी विचारला असता ग्रामसभेत ठरलेली नावांच्या यादीची छाननी केली जाईल. बेघर असलेल्या लोकांना प्राधान्य दिले जाईल. तसेच पडझड झालेल्या घरात राहणाऱ्या लोकांना प्रथम या योजनेचा लाभ द्यावा,अशी मागणी सुजाता हळदीवे यांनी केली.

जमिनीचे बक्षीसपत्र करताना लाभार्थी यांना अडचणी येत आहेत. आपल्या भागात सर्वच सातबारा सामाईक आहेत, त्यावेळी डेटा इन्ट्री मारताना अडचणी येतात. त्यामुळे त्या लाभार्थीचे नुकसान होत आहे. सार्वजनिक विकासासाठी अडचणी आहेत, त्यावर काय मार्ग निघेल? यावर चर्चा सभागृहात करावी अशी मागणी माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी केली. सभापती रावराणे यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढुयात असे सांगितले.

Web Title: Subject of inauguration of new building in the general meeting of Kankavali Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.