राणेंच्या अस्तित्वाची, केसरकरांसाठी प्रतिष्ठेची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 03:33 AM2019-08-05T03:33:07+5:302019-08-05T03:33:37+5:30

शिवसेना-भाजप वर्चस्वासाठी एकवटणार?; स्वाभिमानची सर्व विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी

Rane's existence, the battle of dignity for Kesarkar | राणेंच्या अस्तित्वाची, केसरकरांसाठी प्रतिष्ठेची लढाई

राणेंच्या अस्तित्वाची, केसरकरांसाठी प्रतिष्ठेची लढाई

Next

- महेश सरनाईक

सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्चस्वाची लढाई आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा पहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत केसरकरांनी राणेंना पराभूत करण्यासाठी आखलेली रणनीती यशस्वी झाली होती.

मागील विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत सलग दुसºया पराभवाने राणे यांनी ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबिले असून, त्याचाच एक भाग म्हणून सर्व विरोधी पक्षांना एकवटून राजकीय मैदानात सेना-भाजपशी दोन हात करण्यासाठी सज्जता दाखविली आहे.

सलग सहा वेळा विधानसभेत एका मागोमाग एक अशा विक्रमी मताधिक्याने विजयी होत नारायण राणे यांनी जिल्ह्यात २५ वर्षे अविरत सत्ता गाजविली. मात्र, २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण या मतदार संघातून राणे यांचा पहिल्यांदाच पराभव झाला. यात शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक हे ‘जायंट किलर’ ठरले. त्यांनी राणे यांचा १0, ३७६ मतांनी पराभव करून भगवा फडकविला. त्याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले राणेंचे राजकीय विरोधक दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळविला. त्यातच २0१४ च्या खासदारकीच्या निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा बजावणाºया व नंतर सेनेत प्रवेश करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनपैकी २ जागांवर सेनेचा भगवा फडकविल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केसरकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली.

वांद्रे पूर्व मतदार संघात आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून नारायण राणे यांनी दुसºयांदा विधानसभा निवडणूक लढविली. मात्र, त्यात त्यांचा पुन्हा पराभव झाला. त्यानंतर काही कालावधीत राणे पुन्हा काँग्रेसकडून विधान परिषदेवर आमदार झाले. मात्र, वर्षभरात राणे यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन स्वत:चा स्वाभिमान पक्ष काढला. त्यानंतर राणे भाजपा पुरस्कृत राज्यसभेवर खासदारही झाले. आता राज्यसभेत खासदार असताना राणे पुन्हा कुडाळ-मालवण या मतदार संघात निवडणूक लढवितात की या ठिकाणी दुसºया कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांनी २00९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आमदार होण्याचा मान मिळविला. तर २0१४ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून आमदार म्हणून विधानसभेत दुसºयांदा प्रवेश केला. त्यानंतर ते सेनेतर्फे मंत्रीही झाले.

२०१४ मध्ये कुडाळ मतदार संघात राणेंचा पराभव होत असतानाच कणकवली मतदार संघात राणेंचे दुसरे सुपुत्र नीतेश राणे हे मोठ्या मताधिक्याने काँग्रेसकडून आमदार झाले. त्यामुळे राणेंसाठी हे ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण होते. 

आता विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्यास सावंतवाडी आणि कुडाळ हे दोन मतदार संघ सेनेकडे जाणार आहेत. तर कणकवली भाजपाकडे. कणकवली मतदार संघात नीतेश राणेंच्या विरोधात भाजपाकडून कोण उमेदवार असेल याबाबत अजूनही निश्चिती नाही. या ठिकाणी भाजपातर्फे कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, माजी आमदार प्रमोद जठार हे उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड करत आहेत.

सावंतवाडी मतदारसंघात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना घेरण्यासाठी स्वाभिमानने काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अशा छोट्या पक्षांना एकत्र करत एकच उमेदवार देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात केसरकर यांचे कट्टर समर्थक बबन साळगावकर यांना रिंगणात उतरविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. तर भाजपाकडून या ठिकाणी माजी आमदार राजन तेली यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. युती झाल्यास तेली कोणता निर्णय घेतात हेदेखील तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. मागील निवडणुकीत केसरकर यांच्यानंतर तेलींनाच व्दितीय क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे केसरकरांसाठी सावंतवाडीची लढाई प्रतिष्ठेची आहे.

सध्याचे पक्षीय बलाबल : एकूण जागा ३ : शिवसेना २, काँग्रेस १
सर्वात मोठा विजय
सावंतवाडी : दीपक केसरकर (शिवसेना) मते - ४१,१९२
(पराभव : राजन तेली, भाजप)
सर्वात कमी मताधिक्याने पराभव
कुडाळ : नारायण राणे - (काँग्रेस) १0,३७६
(विजयी : वैभव नाईक - शिवसेना)

कुडाळ मतदार संघात राणेंचा पराभव करणारे वैभव नाईक सेनेकडून दुसºयांदा रिंगणात असतील. मात्र, यावेळी राणे पुन्हा निवडणूक लढवितात काय? की दुसºया कोणाला संधी देतात यावरही भरपूर काही अवलंबून आहे.
एकंदरीत केसरकर आणि राणे यांच्यातील राजकीय लढाईचा पुढील अंक विधानसभेच्या अनुषंगाने पहायाला मिळणार आहे. केसरकर यात विजयाची हॅट्ट्रिक साधत वर्चस्व सिद्ध करतात की राणे पुन्हा कमबॅक करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Rane's existence, the battle of dignity for Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.