सिंधुदुर्ग : राजन तेली हे गटबाजीचे महागुरू : सतीश सावंत यांचा प्रती टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 02:04 PM2018-12-10T14:04:42+5:302018-12-10T14:08:08+5:30

आमच्या पक्षात असताना तेली गटबाजीचे महागुरू होते. आता भाजपातसुद्धा त्यांच्या गटबाजीचा सहकाऱ्यांना त्रास होत आहे. असा प्रती टोला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे.

Rajan Teli is the mastermind of the group: Satish Sawant's copper | सिंधुदुर्ग : राजन तेली हे गटबाजीचे महागुरू : सतीश सावंत यांचा प्रती टोला

सिंधुदुर्ग : राजन तेली हे गटबाजीचे महागुरू : सतीश सावंत यांचा प्रती टोला

googlenewsNext
ठळक मुद्देराजन तेली हे गटबाजीचे महागुरू सतीश सावंत यांचा पत्रकार परिषदेत प्रती टोला

कणकवली : राजन तेली यांना नारायण राणेच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बँक अध्यक्ष, राज्य बँक संचालक, पाटबंधारे महामंडळ उपाध्यक्ष, आमदार ही पदे मिळाली. तरीही राणेंशी बेईमान होणाऱ्या तेलींनी आम्हाला एकनिष्ठा शिकवू नये. आमच्या पक्षात असताना तेली गटबाजीचे महागुरू होते. आता भाजपातसुद्धा त्यांच्या गटबाजीचा सहकाऱ्यांना त्रास होत आहे. असा प्रती टोला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे.

कणकवली येथील स्वाभिमान पक्ष संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, रविंद्र फाटकांच्या पराभवाला राजन तेलींची रणनीतीच कारणीभूत आहे. माझे आणि राजन तेली यांचे पक्षातील हितसंबंध जनतेला आणि पक्षातील कार्यकर्त्यांना माहिती आहेत. मला जेव्हा जेव्हा पदे मिळाली तेव्हा तेव्हा तेलींनी विरोध केला.

२००९ ते २०१४ या काळात तेली सूर्याजी पिसाळ सारखेच वागत होते. फाटक यांच्या पराभवानंतर नारायण राणे आणि तेलींचे संबध बिघडले. त्यामुळे तेलीनी पुण्यात मध्यस्था मार्फत जावून नारायण राणेंची माफी मागितली.

स्वतःला आमदारकीचे तिकीट न मिळाल्यामुळे राणे कुटुंबियांवर तेली यांचा राग होता. राणे कुटुंबियांबद्दल अफवा पसरवणे, गैरसमज पसरवणे हेच काम तेली करीत होते.
एकप्रकारे सूर्याजी पिसाळची भूमिका ते बजावित होते. त्यामुळेच त्यांना राणेंची साथ व पक्ष सोडावा लागला.

तेलीनी माझ्याबद्दल कितीही गैरसमज पसरवले तरी राणे कुटुंबीय आणि जिल्ह्यातील जनता त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. संचयनी प्रकरणात तेली यांनीच मला अडकवले होते. त्यावेळी असलेल्या विरोधकाना हाताशी धरून त्यानी हे प्रयत्न केले. मात्र , मला निष्कारण त्रास दिल्यामुळेच नियतीने तेलीना सत्यविजय भिसे हत्या प्रकरणात ९० दिवस जेलमध्ये ठेवले होते. संचयनीच्या ठेविदारांची एवढीच जर त्याना काळजी असेल तर आता सरकार त्यांच्या पक्षाचे आहे. त्यांनी योग्य ती कायदेशीर लढाई करावी.

तेली यांना नियतीच २०१९ मध्ये धडा शिकवेल. २०१९ मध्ये भाजपातून तेली यांची निश्चितच हकालपट्टी होईल. राजकारणात असलेल्यांच्या कुंडल्या जनतेच्या हातात असतात. त्यामुळे माझ्या कुंडल्या काढण्याची भाषा तेलींनी करू नये. माझी कुंडली जनतेच्या हाती आहे. तेलींच्या घोडगे गावात मी निवडून आलो आहे. तेलीनी यातून बोध घ्यावा . ' खोटे बोल पण रेटून बोल ' ही तेलींची कायमची पद्धत आहे.

नारायण राणेंचा विश्वास असल्याशिवाय इतके वर्षे त्यांच्या बरोबर मी राहिलेलो नाही. राजकारण तसेच व्यवसाय यामध्ये विश्वास घात करण्यात पटाईत असलेल्या तेली यांची विश्वास हा शब्द उच्चारण्याची पात्रता नाही. भाजप मध्ये त्यांचे अवघे चार वर्षांचे वय आहे. त्यामुळे मला भाजपध्ये यायचे निमंत्रण द्यायची त्यांची कूवत नाही. असेही सतीश सावंत यावेळी म्हणाले.

रडीचा डाव मी कधी खेळत नाही!

पदे मिळविण्यासाठी रडीचा डाव मी कधीही खेळत नाही. हे तेलीनी लक्षात घ्यावे. जिल्हा बँक, जिल्हा परिषद इथे पूर्वी प्रमाणेच माझे वर्चस्व आहे. शेतकरी तसेच सामान्य जनतेसाठीच मी काम करीत असतो. त्यामुळे पद असायलाच पाहिजे असा आपला अट्टाहास नाही. असेही सतीश सावंत यानी यावेळी सांगितले.

Web Title: Rajan Teli is the mastermind of the group: Satish Sawant's copper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.