सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेचे सावंतवाडीत संमेलन, अध्यक्षपदी राजन गवस यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 04:44 PM2021-12-08T16:44:55+5:302021-12-08T16:47:39+5:30

'समाज असतो म्हणून साहित्य असतं' हा विचार प्रमाण माणून साहित्या बरोबर सामाजिक क्षेत्रात तळातल्या वर्गासाठी कार्यरत राहणाऱ्या व्यक्तींना जोडून घेण्याच्या उद्देशाने समाज साहित्य संघटना सिंधुदुर्ग ही संस्था सुरू करण्यात आली आहे.

Rajan Gavas as the President of the Samaj Sahitya Sammelan to be held in Sawantwadi | सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेचे सावंतवाडीत संमेलन, अध्यक्षपदी राजन गवस यांची निवड

सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेचे सावंतवाडीत संमेलन, अध्यक्षपदी राजन गवस यांची निवड

Next

सावंतवाडी : सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेचे साहित्य संमेलन शनिवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. डॉ.राजन गवस   यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून कादंबरीकार प्रा.प्रवीण बांदेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

'समाज असतो म्हणून साहित्य असतं' हा विचार प्रमाण माणून साहित्या बरोबर सामाजिक क्षेत्रात तळातल्या वर्गासाठी कार्यरत राहणाऱ्या व्यक्तींना जोडून घेण्याच्या उद्देशाने समाज साहित्य संघटना सिंधुदुर्ग ही संस्था सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर समाज साहित्य संघटनेतर्फे यावर्षी पासून समाज साहित्य पुरस्कार जाहीर केले आहेत.

याच पार्श्वभूमीवर भंडारभोग, चौंडक, धिंगाणा, कळप, तणकट ब-बळीचा असे व्यवस्थेत हस्तक्षेप करणारे कादंबरी लेखन करून साहित्य क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या डॉ.गवस यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर आपल्या चाळेगत,उजव्या सोंडेच्या बाहुल्या, इंडियन ॲनिमल फॉर्म अशा कादंबरीलेखनामधून आजच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रदूषित व्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रा. बांदेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

हे संमेलन दोन सत्रात आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात उद्घाटन तसेच समाज साहित्य संघटनेतर्फे यावर्षी सिंधुदुर्ग सुपुत्र इतिहासकार "गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर समाज पुरस्कार"  कष्टकऱ्यांच्या नेत्या उल्का महाजन यांना जाहीर करण्यात आला आहे. तर काशीराम साटम स्मृती "समाज साहित्य कादंबरी पुरस्कार" कृष्णात खोत यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण गवस यांच्या हस्ते होणार आहे.

दुसऱ्या सत्रात कवी प्राचार्य डॉ गोविंद काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कविसंमेलनात जुन्या-नव्या कवींचे काव्यवाचन होणार असून काव्य वाचनासाठी सहभागी होणाऱ्या कवींनी आपली नावे प्रा.मनीषा पाटील (९४२२८१९४७४) यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन संस्था अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाह सरिता पवार यांनी केले आहे.

Web Title: Rajan Gavas as the President of the Samaj Sahitya Sammelan to be held in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.