Rain fall in Vengurle taluka, traffic jam, Kadal sludge collapse | वेंगुर्ले तालुक्याला पावसाचा तडाखा, वाहतूक ठप्प, केळूस घाटातील दरड कोसळली
वेंगुर्ले तालुक्याला पावसाचा तडाखा, वाहतूक ठप्प, केळूस घाटातील दरड कोसळली

ठळक मुद्देवेंगुर्ले तालुक्याला पावसाचा तडाखा, वाहतूक ठप्पकेळूस घाटातील दरड कोसळली

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात गेल्या चोवीस तासांत झालेल्या मुसळधार पावसाने तालुकावासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरसदृश परिस्थितीने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन काही ठिकाणी वाहतूक बंद होती. तर केळूस घाटीत अतिवृष्टीने दरड कोसळली. केळूस नदीला पूर आल्याने वाहतूक बंद झाली होती.

पुराचे पाणी शेतीबागायतीत घुसल्याने शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वेंगुर्लेप्रमाणे मालवण तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले. किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत असताना सह्याद्री पट्ट्यातील कणकवलीसह अन्य भागात शुक्रवारी कडकडीत ऊन पडले होते.

वेंगुर्ले तालुक्यात गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक १५४.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ४१.१५ मिलीमीटर पाऊस झाला असून, १ जूनपासून आजपर्यंत एकूण १६५९.४३ मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यात गुरुवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. काहीकाळ ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत होता. शहरातील काही रस्त्यांवर पाणी आले, तर शिरोडा बाजारपेठेत साचलेले पाणी दुकानांत शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले.

वेंगुर्लेत पूरस्थिती निर्माण झाली असताना वेंगुर्ले तहसीलमधील नैसर्गिक आपत्कालीन कक्षाचा दूरध्वनी मात्र नादुरुस्त अवस्थेत होता. प्रशासनाने पूरस्थितीची कुठेही पाहणी न केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

तालुकानिहाय चोवीस तासांत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग ०८ (१८१४), सावंतवाडी २० (१३८७), वेंगुर्ले १५४.२ (१९९४.४४), कुडाळ २५ (१६३५), मालवण ४० (१३५४), कणकवली ५४ (१९१६), देवगड ०३ (१२६७), वैभववाडी २५ (१९०८) पाऊस झाला आहे.

केळुसमधील मागासवर्गीय वस्तीला पुराच्या पाण्याचा वेढा

केळूस खालची मागासवर्गीय वस्ती परिसराला पुराच्या पाण्याने वेढले होते. रांजणवाडी व केळूस-मुणगी पूल पाण्याखाली गेल्याने कुडाळ तालुक्याचा केळूस गावाशी संपर्क तुटला तर केळूस घाटीत अतिवृष्टीने दरड कोसळली. वेंगुर्ले-परबवाडा ग्रामपंचायतीनजीकच्या मार्गावर पाणी आल्याने येथील नागरिकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागले.

दाभोली येथील ओहोळाने धोक्याची पातळी गाठली होती. होडावडा येथील पुलावर पाणी चढल्याने काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. वेंगुर्लेतील ओहोळातील पाणी शेतीबागायतीत घुसल्याने शेतीचे नुकसान झाले. तर वेंगुर्ले कॅम्प परिसर पाण्याने वेढलेला होता.

शिरोड्यात दुकानांत पाणी, रस्तेही बंद

शिरोडा बाजारपेठेला पाण्याने वेढल्याने अनेक दुकानांत पाणी शिरून दुकानदारांचे नुकसान झाले. तर शेतीमध्ये पाणी घुसून अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीचेही नुकसान झाले. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे नदीनाले, ओहोळ दुथडी भरून वाहत होते. केळूस पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

कणकवलीत कडकडीत ऊन

वेंगुर्ले, मालवण किनारपट्टीनजीकच्या भागात पाऊस कोसळत असताना कणकवलीत मात्र, सकाळपासूनच वातावरण पूर्णपणे निवळले होते. पावसाने पूर्णपणे उघडीप देत कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे जिल्ह्यात एका भागात पाऊस आणि दुसऱ्या भागात ऊन अशी विचित्र परिस्थिती पहायला मिळाली.


Web Title: Rain fall in Vengurle taluka, traffic jam, Kadal sludge collapse
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.