One-day jail term for accused in firing case | गोळीबार प्रकरणातील आरोपीला ४ दिवसांची कोठडी

गोळीबार प्रकरणातील आरोपीला ४ दिवसांची कोठडी

ठळक मुद्देडुकरावर साधला निशाणा अन् होत्याचे नव्हते झाले काडतुसची बंदूक पोलिसांनी घेतली ताब्यात

कणकवली : तालुक्यातील जानवली- फणसुली जंगलात गुराखी अभिषेक राणे याने संशयित आरोपी रविकांत उर्फ बाबू गणपत राणे (५०, रा. जानवली, गणपतीवाडी) याला रानटी डुक्कर आल्याचे कळविले़ त्यानुसार राणे याने आपल्यासमवेत सखाराम मेस्त्रीसह अन्य तिघांना घेऊन जंगलात धाव घेतली़.

१६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास रानडुकराला मारण्यासाठी फणसुली जंगलात काडतुसच्या बंदुकीने निशाणा धरला. मात्र, तो निशाणा चुकून ती गोळी सखाराम महादेव मेस्त्री (४८, रा़ जानवली गावठणवाडी) यांच्या उजव्या कानावरती डोक्याला लागली. त्यात सखाराम मेस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे आरोपीला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला २० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी शवविच्छेदनाचा अहवाल जिल्हा रुग्णालयातून करून घेतला. या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी नामांकित मोरे, तपासी अधिकारी जंबाजी भोसले यांच्या पथकाने शनिवारी घटनास्थळी जानवली फणसुली जंगलात तपास केला. तसेच गुन्ह्यातील डबल बॅरलची बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आरोपी रविकांत राणे याच्याविरोधात विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुतण्याने दिली कायदेशीर कारवाईसाठी तक्रार

जानवलीतील मेस्त्री मृत्यू प्रकरणात पुतण्या मनोज मंगेश मेस्त्री (३०, रा़ जानवली, गावठणवाडी) याने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आपण स्वप्नील राणे यांच्या घरी गणपती बनविण्यासाठी १६ आॅगस्ट रोजी सकाळी गेलो होतो. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरी परत आलो असता गावातील लोक गोळा झाले होते. त्यावेळी काही जाणकारांनी माझ्या काकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही फणसुली जंगलात गेलो असता काका उताण्या अवस्थेत पडलेले आढळून आले. त्यांच्या उजव्या कानाच्यावरती डोक्यावर जखम झाली होती़.

अधिक माहिती घेतल्यावर रानडुकराला मारण्यासाठी जाऊया असे काकाला रविकांत राणे यांनी सांगितल्याचे कळले. त्यांच्यासमवेत अक्षय राणे, अनिकेत राणे, रंजत राणे असे मिळून एकूण पाच जण होते.

रानटी डुकराला मारण्याच्या उद्देशाने मारलेली गोळी लागून सोबतच्या लोकांना मृत्यू येऊ शकतो याची जाणीव असतानाही रविकांत राणे याने गोळी झाडली. ती गोळी माझ्या काकाला लागल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे गोळी झाडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे म्हटले आहे.

Web Title: One-day jail term for accused in firing case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.