शिंदे सरकारमध्ये नितेश राणेंना मंत्रीपद? दीपक केसरकर, रवींद्र चव्हाणही स्पर्धेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 12:13 AM2022-07-01T00:13:47+5:302022-07-01T00:14:10+5:30

एकनाथ शिंदेचे मंत्रिमंडळ : भाजपच्या राजकीय खेळीने सर्वच अचंबित

Nitesh Rane to be a minister in Shinde government? Deepak Kesarkar and Ravindra Chavan are also in the talk from Sindhudurg | शिंदे सरकारमध्ये नितेश राणेंना मंत्रीपद? दीपक केसरकर, रवींद्र चव्हाणही स्पर्धेत

शिंदे सरकारमध्ये नितेश राणेंना मंत्रीपद? दीपक केसरकर, रवींद्र चव्हाणही स्पर्धेत

Next

- महेश सरनाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्ग : मागील दहा दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील राजकीय पेचप्रसंग एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर थंडावला. भाजपाने मोठी राजकीय खेळी करून बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा व सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून शिंदे यांना मुख्यमंत्री बनविले. तर मुख्यमंत्री म्हणून काम केलेले भाजपाचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता शिंदे यांच्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातील तीन सुपूत्रांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे यांचे समर्थक आणि प्रवक्ते सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, भाजपाचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आणि भाजपाचे कणकवली मतदार संघाचे आमदार नीतेश राणे यांची नावे आघाडीवर आहेत.

महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या आणि केवळ तीन आमदार असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जर दोन किवा तीन मंत्रिपदे मिळत असतील तर भविष्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी येवून विकासाची गंगा जोरात वाहणार आहे. दीपक केसरकर हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात गृहराज्य, अथर्थमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. तर रवींद्र चव्हाण यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. कारण रविंद्र चव्हाण यांची हे सत्तांतर घडविण्यात मोठी आणि महत्वाची भूमिका राहिली आहे. तसेच रवींद्र चव्हाण यांनीही फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बंदरविकास राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांनादेखील आता कॅबिनेटमंत्री मिळणार आहे. चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार असले तरी ते मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे सुपूत्र आहेत. त्यामुळे मालवण आणि सावंतवाडी या जिल्ह्यातील दोन तालुक्याच्या सुपूत्रांना मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री पद मिळणार आहे.
तर भाजपाचे कोकणातील एकमेव आमदार असलेल्या नीतेश राणे यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास जिल्ह्यातील तीन मंत्री होण्याची दाट शक्यता आहे.

रवींद्र चव्हाण सेनेसाठी  ठरले जायंट किलर
माजी मंत्री तथा डोंबिवलीचे भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी हे नवीन सत्ताकारण जुळविण्यात मोठी भूमिका बजावली आहे. शिवसेनेसाठी आमदार चव्हाण हे जायंट किलर ठरले आहेत. त्यामुळे त्यांचे स्थान महत्वाचे आहे.
आमदार रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांना एकत्र करून चव्हाण यांनी गेल्या दहा दिवसांमध्ये हे सर्व सत्तानाट्य घडविले आहे. चव्हाण हे शिंदे समर्थक आमदारांसह मागील दहा दिवसांपासून प्रथम सुरत आणि नंतर आसाममध्ये होते.
आमदार चव्हाण डोंबिवलीतून चांगले काम करत असून ते आरएसएसच्या जडणघडणीतून मोठे झाले आहेत.

भाजपाने मिळविली वाहवा, सेना बॅकफुटवर
मागील आठवडाभर घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांबाबत जनसामान्यांमध्ये सहानुभूतीची लाट होती. भाजपा सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी हे सर्व करत आहेत. असे वाटत असताना भाजपाने मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंना देवून भाजपाने वाहवा मिळवत सेनेला बॅकफुटवर टाकले आहे.

नीतेश राणेंबाबतच्या निर्णयाकडे लक्ष
आमदारकीची दुसरी टर्म निवडून आलेल्या आणि भाजपाचे दक्षिण कोकणात कणकवलीतील एकमेव आमदार असलेल्या नीतेश राणे यांना मंत्रिपदाची संधी मिळणार का? याबाबत आता तर्कवितर्क लढविले जात आहेत. ते फडणवीस यांच्या मर्जीतील आहेत. मात्र, दुसर्या बाजूने नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे एकाच घरात दोन मंत्री कसे होणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात तीन मंत्रिपदे मिळल्यास विकासाची गंगा
जिल्ह्यातील तीन सुपूत्रांना मंत्रीपदे मिळण्याची दाट शक्यता यातून निर्माण झाली आहे. तसे झाल्यास दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण आणि नीतेश राणेंना मंत्रिपद मिळाल्यास जिल्ह्याचा विकास झपाट्याने होणार आहे. त्यातच नारायण राणे हे केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने एकत्रित विकासाची गंगा, मोठ्या प्रमाणावर निधी आगामी काळात जिल्ह्यात येवू शकतो. त्याचा फायदा भविष्यात भाजपाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

आगामी सर्वच निवडणुकांमध्ये भाजप होणार शतप्रतिशत
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाची सरशी होण्याची शक्यता आहे. यातील काही सत्तास्थाने आता शिवसेनेकडे होती भविष्यात ही सर्व सत्तास्थाने भाजपाकडे येतील आणि आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप शतप्रतिशत यश मिळणार आहे.

Web Title: Nitesh Rane to be a minister in Shinde government? Deepak Kesarkar and Ravindra Chavan are also in the talk from Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.