आंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 04:07 PM2019-09-10T16:07:11+5:302019-09-10T16:08:38+5:30

संपूर्ण जून महिनाभर दडी मारलेल्या आंबोलीतील पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजेरी लावली. परंतु हा पाऊस जो सुरू झाला तो सप्टेंबरची ९ तारीख उजाडली तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आंबोलीमध्ये पर्जन्यमापन करणारे भाऊ ओगले यांनी आंबोलीत आतापर्यंत गेल्या २५ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगितले आहे.

Most of the rain in Amboli, Cherapunji was also left behind | आंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागे

आंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागे

googlenewsNext
ठळक मुद्देआंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागेजुलैपासून पावसाला सुरुवात; ८५७५ मिलीमीटर पावसाची नोंद

आंबोली : संपूर्ण जून महिनाभर दडी मारलेल्या आंबोलीतील पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजेरी लावली. परंतु हा पाऊस जो सुरू झाला तो सप्टेंबरची ९ तारीख उजाडली तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आंबोलीमध्ये पर्जन्यमापन करणारे भाऊ ओगले यांनी आंबोलीत आतापर्यंत गेल्या २५ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगितले आहे.

आतापर्यंत तब्बल ३४० इंच म्हणजेच ८५७५ मिलीमीटर पाऊस झाल्याचे त्यांनी सांगितले.
आंबोलीतील जाणकारांच्या म्हणण्यानुसार तीस वर्षांपूर्वी असा पाऊस पडत असे, तो पुन्हा यावर्षी बघायला मिळाला. त्याकाळी मे महिन्याच्या १५ तारीखला पाऊस सुरू होत असे, तो आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पडत असे. ४०० किंवा ४५० इंच पाऊस आंबोलीत पडत असे.

मधल्या काळात जागतिक तापमान वाढ, वृक्षतोड अशा विविध कारणांमुळे आंबोलीतील पाऊस कमी झाला होता. २९० इंच ते ३०० इंच इतका पाऊस आंबोलीत होत असे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहता २०१५ साली २९२ इंच, २०१६ साली १९० इंच, २०१७ मध्ये २८३, २०१८ साली २९६ इंच आणि २०१९ साली म्हणजेच यावर्षी हा पाऊस तब्बल त्रिशतक गाठून ३४० इंचापर्यंत पोहोचला आहे.

भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी येथे पडतो. मात्र, यावर्षी तो ६१०० मिलीमीटर इतकाच झाला आहे. मात्र, आंबोलीत ८५७५ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आंबोलीच्या पावसाने यापूर्वीची सर्व रेकॉर्ड ब्रेक केली आहेत, असेच जाणकारांकडून बोलले जात आहे.

आणखी तब्बल एक महिना पावसाचा शिल्लक असून या एक महिन्यात सात इंचापेक्षा जर जास्त पाऊस झाला तर आंबोलीच्या इतिहासातील सर्वात जास्त पाऊस यावर्षी झाला, असे म्हटले जाईल.

पर्यटन व्यावसायिकांना बसतोय फटका

आंबोलीत कोसळलेल्या यावर्षीच्या पावसामुळे आंबोलीतील जनजीवन विस्कळीत झाले. शेतीचे नुकसान झाले. घाटामध्ये ठिकठिकाणी रस्ते खचले, दरडी कोसळल्या. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायिकांनासुद्धा त्याचा फटका बसला. संपूर्ण महाराष्ट्रालाच यंदाच्या वर्षी पावसाने झोडपून काढले.

आंबोलीमध्ये कोसळणाऱ्या पावसाचे पाणी कोल्हापूर जिल्हा, बेळगावातील काही भाग तसेच बांदा आदी भागांमध्ये जात असते. आंबोलीत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या भागांमध्येसुद्धा पाणी येण्यास आंबोलीचा पाऊस कारणीभूत ठरला होता.

Web Title: Most of the rain in Amboli, Cherapunji was also left behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.