ईश्वरी तेजम यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 05:22 PM2020-01-29T17:22:57+5:302020-01-29T17:25:08+5:30

आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ३७ व्या गंधर्व शास्त्रीय संगीत मासिक सभेत कुडाळ येथील प्रतिथयश गायिका ईश्वरी तेजम - परब यानी आपल्या अभ्यासपूर्ण गायकीने रंग भरले. तसेच रसिकांना मंत्रमुग्ध करीत अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा चालू ठेवण्यासाठी सिंधुदुर्गातील युवा पिढी सक्षम असल्याचे यानिमित्ताने दाखवून दिले.

Ishwari Tejam's singing is enchanting! | ईश्वरी तेजम यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध !

आशिये येथे गंधर्व शास्त्रीय संगीत सभेत ईश्वरी तेजम - परब यानी सुमधुर गायन केले.

Next
ठळक मुद्देईश्वरी तेजम यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध !गंधर्व शास्त्रीय संगीत सभा ; आशिये येथे आयोजन

कणकवली :आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ३७ व्या गंधर्व शास्त्रीय संगीत मासिक सभेत कुडाळ येथील प्रतिथयश गायिका ईश्वरी तेजम - परब यानी आपल्या अभ्यासपूर्ण गायकीने रंग भरले. तसेच रसिकांना मंत्रमुग्ध करीत अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा चालू ठेवण्यासाठी सिंधुदुर्गातील युवा पिढी सक्षम असल्याचे यानिमित्ताने दाखवून दिले.

कोकणात आता शास्त्रीय संगीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करु लागले आहे. काही मोजके संगीत साधक शास्त्रीय संगीताचा अभ्यास करुन ते योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यन्त पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत .

पूर्वाश्रमिच्या नूतन परब व आताच्या ईश्वरी गुरुप्रसाद तेजम यांना त्यांचे आजोबा रघुवीर परब , तबला वादक वडिल दिनकर परब यांच्याकडून संगीत वारसा मिळाला आहे. संगीताचे प्राथमिक शिक्षण कुडाळ येथील राजन माडये व प्रशांत धोंड यांच्याकडून त्यांनी घेतले. त्यानंतर त्यानी धोंडू ताई कुलकर्णी,पं. विकास कशाळकर यांचेकडे शिक्षण घेऊन संगीत विशारद व अलंकार या पदव्या प्राप्त केल्या आहेत.

कथक नृत्याचाही अभ्यास त्यांनी केला आहे. सध्या त्या कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या सघन गान केंद्रात पं. समीर दुबळे (पं. जीतेंद्र अभिषेकी व डॉ. अशोक रानडे यांचे शिष्य) यांचेकडे पुढील शिक्षण घेत आहेत.

आशिये येथे दर्दी रसिकांच्या उपस्थितीत रंगलेल्या मैफिलीत त्यानी राग भूप ने सुरुवात केली. विलंबित झुमरा तालामध्ये 'अब मन ले ' हि बंदिश सादर केली . त्यानंतर त्यानी बसंत केदार हा जोडराग सादर केला. शास्त्रीय संगीतावर आधारित नाट्यपद व अभंगही सादर केले. दरम्यान संपदा प्रभुदेसाई यानी घेतलेल्या मुलाखतीला ईश्वरी यानी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.

गाण्यातील शिस्त,रियाज,गुरुनिष्ठा,थोड्याशा यशाने हुरळून न जाणे,पालकांची भूमिका व जबाबदारी, स्थानिक पातळीवरील सांगीतिक चळवळ, प्रतिथयश गायकांची गायकी ऐकणे अशा अनेक बाजूना स्पर्श करत स्वत:चा सांगितिक प्रवास उलगडला. त्यांच्या अत्यंत सुरेख,अभ्यासपूर्ण व मौलिक विचारानी श्रोते भारावले .

त्यानी आपल्या मैफिलीची सांगता भैरवीने केली. त्याना हार्मोनियम साथ त्यांचे बंधु उमेश परब ( अप्पा जळगावकर यांचे शिष्य)तर तबलासाथ कुडाळ येथील सुप्रसिद्ध युवा तबला वादक सिद्धेश कुंटे (पं. योगेश सम्सी यांचे शिष्य) यानी समर्थपणे केली. पल्लवी पिळणकर हिने तानपुरा साथ केली

कळसुली येथील जयवंत कुलकर्णी यानी कलाकारांचे स्वागत केले . ही सभा कवी व गीतकार मिलिंद कुलकर्णी यानी पुरस्कृत केली होती. ध्वनीसंयोजन कुकारो साउंडचे संतोष सुतार यांनी केले .

आपल्याच मातीतील संगीत साधकांचे कौतुक करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या संगीत रसिकांचा उदंड प्रतिसाद या मैफिलीला मिळाला. ही संगीत सभा यशस्वी होण्यासाठी अभय खडपकर,मनोज मेस्त्री, दामोदर खानोलकर,सागर महाडिक,विलास खानोलकर,संतोष सुतार,किशोर सोगम,शाम सावंत, विजय घाटे, संजय कात्रे, करंबेळकर परिवार यानी विशेष परिश्रम घेतले. या सभेसाठी संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

३८ वी संगीत सभा १६ फेब्रुवारी रोजी!

गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने ३८ वी संगीत सभा १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५. ३० वाजता होणार आहे. गोवा कला अकादमीतील संगीत गुरु सचिन तेली हे ही मैफिल सजवणार आहेत. या संगीत पर्वणीचा संगीत प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन गंधर्व फाऊंडेशनतर्फे यावेळी करण्यात आले .

 

Web Title: Ishwari Tejam's singing is enchanting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.