If the farmers do not get compensation, the agriculture department will be responsible! | शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास कृषी विभागच जबाबदार !
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास कृषी विभागच जबाबदार !

ठळक मुद्देशेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास कृषी विभागच राहील जबाबदार !कणकवली पंचायत समिती सभेत सदस्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

कणकवली : अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे कणकवली तालुक्यात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडून पडले असून नुकसानीचे पंचनामे अजूनही पूर्ण झालेले नाहीत. याचा परिणाम शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यावर होऊ शकतो. त्यामुळे त्याबाबत आवश्यक ती काळजी घेऊन कुठलीही हयगय न करता शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करा. नुकसान भरपाई न मिळाल्यास त्याला सर्वोतोपरी कृषी विभागच जबाबदार राहील, अशा शब्दात पंचायत समिती सदस्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.

कणकवली पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभापती सुजाता हळदिवे यांच्या अध्यक्षतेखाली प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसभापती सूचिता दळवी , गटविकास अधिकारी मनोज भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती पाटील आदी उपस्थित होते.

या सभेत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला. नुकसानीच्या पंचनाम्याबाबत भाग्यलक्ष्मी साटम यांनी मुद्दा उपस्थित केला. त्याला इतर सदस्यांनीही अनुमोदन दिले.

यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी ८० ते ९० टक्के पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले. तसेच त्याबाबतचा अहवाल तहसीलदारांना सादर करण्यात आला असून तालुक्यातील पूर्ण भागाचा पंचनामा करून नुकसानीचा आकडा कळविण्यास विलंब होणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

पंचनामा करण्यास वेळ झाला तरी शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही . असेही त्यांनी सांगितले, तर गटविकास अधिकाऱ्यांनी त्याबाबत तहसील कार्यालयात बैठक असल्याचे सांगितले. त्यावेळी कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायलाच हवी अशी भूमिका मांडतानाच त्यासाठी प्रयत्न करा असे अधिकाऱ्यांना सदस्यांनी सांगितले.

वीज वितरण कंपनीचे अधिकारी अनेकवेळा सभेला उपस्थित नसतात. त्यामुळे आम्ही सभागृहात मांडलेले प्रश्न सुटणार कसे ? असा प्रश्न मनोज रावराणे यांनी उपस्थित केला. तसेच गेल्या वर्षभरात वीज वितरण बाबतचे आम्ही मांडलेले प्रश्न व त्यावर काय कार्यवाही झाली ? या बाबतची माहिती पुढील सभेत देण्यात यावी . अशी मागणी त्यांच्यासह गणेश तांबे व अन्य सदस्यानी केली.

तालुक्यात एका महिन्याचे वीज देयक भरले नाही म्हणून ग्राहकाला कुठलीही पूर्वकल्पना न देता मिटर कापून नेण्याच्या घटना वीज कर्मचाऱ्यांकडून घडत आहेत. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अशी कृती करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार असा प्रश्न मनोज रावराणे यांनी उपस्थित केला असता. चौकशी करून कारवाई करू असे उत्तर वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले.

लेप्टो, डेंग्यू , तापसरी अशा आजारांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात यावेत. तसेच दूषित पाणी नमुने वाढल्यास त्यावर उपाययोजना कराव्यात. असे सदस्यांनी यावेळी सुचविले.

तालुक्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्याठिकाणी अपघात होऊन वाहनचालकांना दुखापत होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक स्वतःच खड्डे बुजवत आहेत. मात्र, या संबधित रस्त्यांचे काम केलेले ठेकेदार गेले कुठे ? असा प्रश्न मनोज रावराणे यांनी उपस्थित केला. तसेच या रस्त्यांच्या स्थितीला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा. अशी मागणीही त्यांनी केली. तर कासार्डे पियाळी मार्गे फोंडा रस्ता पूर्णतः खराब झाला असून त्याबाबत सभागृहात अनेकवेळा प्रश्न उपस्थित करूनही काहीच कार्यवाही का झाली नाही? असा प्रश्न प्रकाश पारकर यांनी उपस्थित केला.

यावेळी संतप्त झालेल्या सर्वच सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक जबाबदार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात यावी असा ठराव केला. त्याला सभापती सुजाता हळदिवे यांनी संमती दर्शविली.

सभेला विविध खात्यांचे प्रमुख अनुपस्थित असतात. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र, त्याचे अजूनही काहीच उत्तर आलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना पत्र लिहिण्याचे ठरविण्यात आले. १५ वा वित्त आयोग , एमआरजीएस योजना, एसटी सेवा, वन्य प्राण्याकडून होणारे शेतीचे नुकसान आदी विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

अनुपस्थित सदस्यांची नावे ठरावात !

पंचायत समितीच्या ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेत अनुपस्थित असलेल्या सदस्यांची नावे विविध ठरावांच्यावेळी सूचक व अनुमोदक म्हणून इतिवृत्तात नमूद करण्यात आली आहेत. असे या सभेच्यावेळी माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, गणेश तांबे, मनोज रावराणे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच प्रशासनाच्या या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

तालुक्यात आतापर्यंत १६ लेप्टो सदृश रुग्ण !

जून महिन्यापासून कणकवली तालुक्यात १६ लेप्टो सदृश रुग्ण स्पॉट टेस्ट मध्ये आढळले आहेत. त्यापैकी १४ रुग्ण पूर्णतः बरे झाले आहेत. तर एक रुग्ण गोवा बांबूळी येथे उपचार घेत आहे. तसेच एक रुग्ण दगावला आहे.ऑक्टोबर महिन्यात सात डेंग्यू सदृश रुग्ण आढळले होते. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने सभागृहात देण्यात आली.

Web Title: If the farmers do not get compensation, the agriculture department will be responsible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.