परतीच्या पावसानं दाणादाण; सिंधुदुर्गात भातपिकाचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 01:54 PM2020-10-14T13:54:44+5:302020-10-14T13:57:15+5:30

मुसळधार पावसामुळे भाताचं प्रचंड मोठं नुकसान; शेतकरी चिंतातूर

heavy rainfall damage rice crops in sindhudurg | परतीच्या पावसानं दाणादाण; सिंधुदुर्गात भातपिकाचं नुकसान

परतीच्या पावसानं दाणादाण; सिंधुदुर्गात भातपिकाचं नुकसान

googlenewsNext

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले तीन दिवस पडणाऱ्या परतीच्या पावसाने दाणादाण उडवली असून तालुक्यातील भात शेती आडवी झाल्याने हाता तोंडचा घास पाऊस हिरावून घेत असल्याने बळीराजा चिंतातुर बनला आहे. पावसाळी हंगाम संपला तरी गेले दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भात शेती जमिनीवर आडवी झाली आहे. त्यामुळे आधीच कोरोनाच्या संकटाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आणखीन एक जोराचा फटका बसला आहे.

यावर्षी कोरोनाचे संकट कोसळले असताना देखील शेतकऱ्यांनी पावसाळी शेती करणे सोडले नव्हते.प्रतिवर्षाप्रमाणे पारंपरिक तसेच संकरित बियाण्यांचा वापर करून शेतकऱ्यांनी मोठया उमेदीने भाताची लागवड केली होती. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावी परतलेल्या चाकरमान्यांनी यावर्षी जोरदार भात शेती केली होती. मात्र, परतीच्या पावसाने त्या शेतीला जोरदार फटका दिला आहे. यावर्षीच्या हंगामात तर सर्वच ठिकाणी चांगली भात शेती बहरली होती. सध्या शेतकऱ्यांची भात कापणीची लगबग सुरू असतानाच पावसाने जोर धरल्याने भात शेती आडवी झाली आहे.

बळीराजा चिंतातूर
काबाड कष्ट करून केलेल्या शेतीचा हाता तोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून नेत असल्याने येथील बळीराजा मात्र चिंतातूर बनला आहे.

Web Title: heavy rainfall damage rice crops in sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.