Give me 3,000 votes from Malvan, appeals to Narayan Rane activists | मालवणमधून मला ५० हजार मते द्या, नारायण राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
मालवण येथे स्वाभिमान पक्षाच्या बैठकीत खासदार नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

ठळक मुद्देमालवणमधून मला ५० हजार मते द्या, नारायण राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन तुमच्या अडीअडचणीला धावून येणारा उमेदवार देणार

मालवण : गेल्या पाच वर्षांत आमदार, खासदार, पालकमंत्री आपले नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याची अधोगती झाली. लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी जिल्ह्यात आमची ताकद जास्त आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मला मालवण तालुक्यातून ५० हजार मते मिळाली पाहिजेत. यावेळी मला संधी दिली नाही तर जिल्हा अजून मागासलेला होईल, अशी भीती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली.

मालवण येथील दैवज्ञ भवन येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीची बैठक खासदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सभापती सोनाली कोदे, बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस, जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर, सरोज परब, कृष्णनाथ तांडेल, सुहास हडकर, राजन सरमळकर, अशोक तोडणकर, अशोक बागवे, महेश जावकर, लीलाधर पराडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राणे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून मी यशस्वी झालो. मात्र, सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलो तरी यशस्वी होऊ शकलो नाही, ही दु:खाची बाब आहे. मागील निवडणुकीत वैभव नाईक यांनी केलेला पराभव मी विसरू शकत नाही. १९९० पासून मला ८० टक्केच्यावर मताधिक्य मिळायचे. मात्र, लोकसभा निवडणुकीत मताधिक्याची टक्केवारी घसरली असून महिन्याभरात सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

मतांची टक्केवारी ८० टक्के एवढी व्हायला पाहिजे. कुडाळ-मालवणमध्ये कोणता उमेदवार द्यायचा हे मी जाहीर करणार आहे. तुमच्या अडीअडचणीला धावून येईल, असा उमेदवार देईन. त्यामुळे गटातटाचे राजकारण न करता गावागावात जाऊन एकदिलाने पक्षहितासाठी काम करा. निवडणुकीआधी प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघात मी भेट देईन.

पाच वर्षांत जिल्ह्यातील मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची वाताहात झाली. जिल्ह्याचे अर्थकारण बदलण्याची क्षमता असलेले प्रकल्प मी आणले. मात्र, तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी ते प्रकल्प बंद केले. येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल असा एकही प्रकल्प आणू शकले नाहीत.

सी-वर्ल्डमुळे मालवणचे नव्हे तर जिल्ह्याचे रुप बदलणार होते, मात्र त्यालाही या लोकांनी विरोध केल्याने जिल्हा मागासलेला राहिला आहे. मी आमदार, मंत्री म्हणून कमी पडलो का? आपल्या मतदारसंघात हक्काचा आमदार, खासदार तसेच पालकमंत्री नसल्याने अधोगती सुरू आहे, असा टोलाही राणेंनी सत्ताधाऱ्यांना हाणला.

यावेळी सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपोषण आंदोलनाला राणेंनी पाठिंबा दिला. जिल्ह्याला विकासनिधी कमी पडू देणार नाही. कार्यकर्त्यांनी माझ्याकडे विकासकामे आणावीत. प्रत्येकाला न्याय देण्याचे काम मी करेन, असेही राणे यांनी सांगितले. स्वाभिमान पक्षाच्यावतीने जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे. त्याबाबत पक्षाकडून नियोजन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 


Web Title: Give me 3,000 votes from Malvan, appeals to Narayan Rane activists
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.