Fasting of MNS in Malwa; | मालवणात मनसेचे उपोषण, सत्ताधाऱ्यांवर उपरकर यांनी डागली तोफ
मालवण तहसीलदार कार्यालयासमोर मनसेच्यावतीने उपोषण आंदोलन छेडण्यात आले.

ठळक मुद्देमालवणात मनसेचे उपोषणसत्ताधाऱ्यांवर परशुराम उपरकर यांनी डागली तोफ

मालवण : सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असताना जिल्हा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना झाल्या नाहीत. पालकमंत्र्यांनी पूर्ण जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी न करता केवळ सावंतवाडी मतदारसंघाचा दौरा केला. त्यांच्यासह शिवसेना खासदार, आमदारही पूरग्रस्तांना दिलासा देण्यास फिरकले नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यास मनसेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात आले.

मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या या उपोषणात मनसे, स्वाभिमान, शिवसेना, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. देवबाग संघर्ष समितीने पाठिंबा दिल्याने देवबाग ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती. मनसेतर्फे छेडलेल्या उपोषणात अनेकांनी देवबाग गावाच्या हितासाठी आणि निद्रिस्त शासनाला जाग आणण्यासाठी हे उपोषण असल्याने त्यात सहभागी झाल्याचे स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, माजी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश अंधारी, मनविसे उपाध्यक्ष पास्कोल रॉड्रिक्स, सचिव विल्सन गिरकर, संकेत वाईरकर, गुरू तोडणकर, राजेंद्र चव्हाण, चंद्रकांत गावडे, संघर्ष समितीचे अध्यक्ष देवानंद चिंदरकर, सचिव प्रकाश मुनणकर, माजी सरपंच उल्हास तांडेल, तारकर्ली सरपंच स्नेहा केरकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, माजी नगरसेवक राजन सरमळकर, दाजी सावजी, दिलीप घारे, डॉ. सदाशिव राऊळ, मोहन कुबल, अल्बर्ट रॉड्रिक्स, मनोज खोबरेकर, उपसरपंच तमास फर्नांडिस यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झाले होते.

उपरकर म्हणाले, मुसळधार पाऊस व त्यामुळे महापूर, उधाणाचा समुद्र किनारपट्टीला मोठा तडाखा बसला. देवबाग, तळाशिल दुभंगण्याची स्थिती निर्माण झाली होती. काळसे बागवाडी येथील घरे पाण्याने वेढली गेली. या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्र्यांनी दौरा करायला हवा होता. मात्र सावंतवाडी मतदार संघ वगळता ते अन्यत्र फिरकलेच नाहीत.

आश्वासनानंतर उपोषण स्थगित

तहसीलदार अजय पाटणे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. पत्तन विभागाने आवश्यक त्या ठिकाणी बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी पाहणी करून कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. यावेळी पोलीस निरीक्षक विनित चौधरी उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपरकर यांनी दुपारी उपोषण स्थगित केले.
 


Web Title: Fasting of MNS in Malwa;
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.