Eventually the Talere-Kolhapur highway starts, stopping for the stopped vehicles | अखेर तळेरे-कोल्हापूर महामार्ग सुरू, मुक्काम ठोकलेल्या वाहनांचे मार्गक्रमण
अखेर तळेरे-कोल्हापूर महामार्ग सुरू, मुक्काम ठोकलेल्या वाहनांचे मार्गक्रमण

ठळक मुद्देअखेर तळेरे-कोल्हापूर महामार्ग सुरूमुक्काम ठोकलेल्या वाहनांचे मार्गक्रमण

वैभववाडी : अतिवृष्टीमुळे बंद झालेला तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल अकराव्या दिवशी सुरू झाला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून या मार्गावर अवजड वाहने धावू लागल्याने वाहन चालकांसह व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील जनजीवन सुरळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पंचगंगेच्या पुराची पातळी वाढल्याने १ आॅगस्टच्या रात्रीपासून प्रशासनाने बालिंगा (कोल्हापूर) पुलावरून अवजड वाहनांना बंदी घातली होती. त्याच दरम्यान गगनबावडा ते कोल्हापूर दरम्यान मांडकुली, किरवे, लोंघे येथे पुराचे पाणी रस्त्यावर आले होते. मात्र, ४ आॅगस्टला दुपारी २-३ तासच हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला होता. त्यानंतरच्या अतिवृष्टीमुळे महापुराने रौद्र रुप धारण केले होते.

कोल्हापूरला महापुराचा विळखा पडल्याने काही दिवस सिंधुदुर्गचा कोल्हापूरशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे परिसरात जाणाऱ्या अवजड वाहनांनी तळेरे-कोल्हापूर मार्ग सुरू होण्याच्या प्रतीक्षेत वैभववाडीत मुक्काम ठोकला होता.

मंगळवारी सकाळी कोल्हापूरहून गगनबावडामार्गे अवजड वाहने वैभववाडीत पोहोचत गेल्या ८-९ दिवसांपासून वैभववाडीत मुक्काम ठोकलेल्या वाहनांनी कोल्हापूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. गगनबावडा कोल्हापूर मार्ग सुरू झाल्यामुळे व्यापारी सुखावले आहेत.


Web Title: Eventually the Talere-Kolhapur highway starts, stopping for the stopped vehicles
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.