हत्ती नुकसान भरपाई :प्रस्ताव पाठविताना कुचराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 04:39 PM2020-09-24T16:39:42+5:302020-09-24T16:45:32+5:30

हत्तींनी शेती व बागायतींच्या केलेल्या नुकसान भरपाईचे कायदेशीर पंचनामे करून तयार केलेले प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यास वनक्षेत्रपाल कुचराई करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.यासाठी संदेश राणे व सिद्धेश राणे यांनी दोडामार्ग येथे वनविभाग कार्यालयानजीक उपोषण छेडले आहे.

Elephant Compensation: Waste while sending proposal | हत्ती नुकसान भरपाई :प्रस्ताव पाठविताना कुचराई

दोडामार्ग वनविभाग कार्यालयानजीक संदेश व सिद्धेश राणे यांनी उपोषण छेडले आहे.

Next
ठळक मुद्देहत्ती नुकसान भरपाई :प्रस्ताव पाठविताना कुचराईसंदेश, सिद्धेश राणेंचे दोडामार्ग वनविभाग कार्यालयासमोर उपोषण

दोडामार्ग : हत्तींनी शेती व बागायतींच्या केलेल्या नुकसान भरपाईचे कायदेशीर पंचनामे करून तयार केलेले प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यास वनक्षेत्रपाल कुचराई करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच राखीव जंगलाची होत असलेली तोड याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी संदेश राणे व सिद्धेश राणे यांनी दोडामार्ग येथे वनविभाग कार्यालयानजीक उपोषण छेडले आहे.

वनविभागाच्या क्षेत्रात बांबर्डे येथे झालेली अवैध वृक्षतोड, सौरकुंपण कामातील अफरातफर, हेवाळे बांबर्डे वनक्षेत्रात झालेली वनबंधाऱ्याची दर्जाहीन कामे व कामात लाखोंची अफरातफर झालेली आहे. या झालेल्या अफरातफरीस दोडामार्ग वनविभागाचे वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांचा वरदहस्त आहे. असा आरोप येथील शेतकरी सिद्धेश राणे व संदेश राणे यांनी केला आहे.

३० जून, ५ आॅगस्ट व २६ आॅगस्ट २०२० रोजी हत्तींंनी शेतीची नुकसानी केली. त्या नुकसानीचे वनपालांंकडून कायदेशीर पंचनामे करण्यात आले. तसे नुकसानीचे प्रस्तावही सादर करण्यात आले. मात्र, ते प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागले.

प्रकरण सादर केल्यापासून २६ दिवसांत नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अनिवार्य आहे. मात्र, ते प्रस्ताव दोडामार्ग कार्यालयात धूळखात पडले असल्यास नुकसान भरपाई कोठून मिळणार? याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. असा आरोप करीत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण छेडले आहे.

या उपोषणाला राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. कसई-दोडामार्गचे प्रभारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप कार्यकर्ते शैलेश दळवी, योगेश महाले तसेच शिवसेना तालुकाध्यक्ष बाबुराव धुरी, उपजिल्हासंघटक गोपाळ गवस, महिलाआघाडी व उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, विभागप्रमुख विजय जाधव, रामदास मेस्त्री, भगवान गवस, दौलत राणे, भीमराव राणे आदींनी पाठिंबा दिला.

तक्रारी असलेले प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवू नयेत : वरिष्ठांचा आदेश

नुकसान भरपाईबाबत ज्या प्रस्तावात तक्रारी आहेत ते प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येऊ नयेत असे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेले आहेत. राणेंनी जो प्रस्ताव केला आहे ते क्षेत्र सामाईक आहे. त्यापैकी त्यांनी लागवड केलेल्या क्षेत्रातील शेतीचे हत्तींंनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.

तसा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. कोणाची तक्रार येणार नाही असे राणे यांनी हमी पत्र देखील दिले होते. मात्र, त्याबाबत इतर ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही, असे वनक्षेत्रपाल कोकरे यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title: Elephant Compensation: Waste while sending proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.