CoronaVirus Lockdown : नियम न पाळल्यास दुकाने सील, सावंतवाडी नगराध्यक्षांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 01:51 PM2020-05-19T13:51:50+5:302020-05-19T13:55:40+5:30

सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्यात यावेत असे निर्बंध घातले असताना काही दुकानांमध्ये या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. शहराच्या दृष्टीने हा धोका आहे. यापुढे पालिका गप्प बसणार नाही. अशा दुकानांवर कडक कारवाई करून ती सील करावी लागतील, असा इशारा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.

CoronaVirus Lockdown: Shops will be sealed if rules are not followed, Sawantwadi mayor warns | CoronaVirus Lockdown : नियम न पाळल्यास दुकाने सील, सावंतवाडी नगराध्यक्षांचा इशारा

सावंतवाडीतील बैठकीत नगराध्यक्ष संजू परब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देनियम न पाळल्यास दुकाने सील, सावंतवाडी नगराध्यक्षांचा इशारा नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणू नका

सावंतवाडी : सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्यात यावेत असे निर्बंध घातले असताना काही दुकानांमध्ये या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. शहराच्या दृष्टीने हा धोका आहे. यापुढे पालिका गप्प बसणार नाही. अशा दुकानांवर कडक कारवाई करून ती सील करावी लागतील, असा इशारा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.

ते सावंतवाडी येथे बोलत होते. यावेळी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी उपस्थित होते. शहरातील दुकानदारांना नगरपालिकेने वेळ ठरवून दिली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी ही वेळ आहे. एक दिवसाआड एक दुकान सुरू ठेवावे अशीही अट घालण्यात आली आहे.

परब म्हणाले, शहरात ज्या लोकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे त्यांना घरचा डबा देण्याऐवजी कंटेनरमधून जेवण देण्यात यावे. कारण अशा लोकांना घराकडून दिलेला डबा पुन्हा धुऊन परत घरी पाठविला जातो असे निदर्शनास आले आहे.

विलगीकरण कक्षातील व्यक्ती जर कोरोनाबाधित आढळली तर या डब्याच्या माध्यमातून प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी हा धोका टाळण्यासाठी अशा लोकांना कंटेनरमधून जेवण देण्यात यावे असेही त्यांनी स्पष्ट केले.

गरोदर महिला, स्तनदा माता, वृद्ध व्यक्ती, अपंग यांना गृह विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात येईल. शासनाने अशा लोकांना शिथिलता दिली असली तरीही नियमांचे पालन होणे सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून जर नियम तोडला जात आहे असे निदर्शनास आल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी असलेल्या व्यक्तींसाठी पालिकेकडून चटई देण्यात आल्या आहेत. याचबरोबर सुरक्षेचा उपाय म्हणून अशा ठिकाणी होमगार्डची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू असून लवकरच तशी व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सावंतवाडी शहरात पुणे, मुंबई येथून काही जण येत आहेत. तसेच बाहेरच्या जिल्ह्यात जाणारे काही नागरिकही बाजारपेठेत फिरताना दिसून आले आहेत. अशाप्रकारे त्यांच्या फिरण्यामुळे शहरात धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून उपाययोजना राबविण्यात येणार असून अशा लोकांना शहराच्या हद्दीवर अडवून त्यांची तपासणी करून त्यांना त्यांच्या गावात परत पाठविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सावंतवाडी शहराच्या हिताच्या दृष्टीने दुकानदारांना नियम आखून दिले असतानाही दुकानदारांकडून ते पाळले जात नाहीत. नियमांची सरळसरळ पायमल्ली होत असल्याने आता कडक कारवाई म्हणून अशी दुकाने सील करण्यात येणार आहेत.

त्या अगोदर संबंधित दुकानदारांना नोटीस बजावून कल्पना देण्यात येणार आहे. मात्र तरीही यात सुधारणा न झाल्यास कारवाई हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनीही सोशल डिस्टन्सिंग व नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे परब यांनी सांगितले.

चाकरमान्यांची व्यवस्था करणार

सावंतवाडी शहरात जे पेड क्वारंटाईनसाठी येणार आहेत अशा चाकारमान्यांना परवडतील असेच दर ठेवण्यात आले आहेत. आम्ही काही हॉटेल निवडली असून, त्या हॉटेलची नावे येणाऱ्या चाकरमान्यांसमोर ठेवण्यात येतील.

त्यांनी त्यातील हॉटेल निवडावे, असे आवाहन नगराध्यक्ष संंजू परब यांनी केले आहे. शहरात येणारे चाकरमानी हे शहरातीलच असतील. ग्रामीण भागातील चाकरमान्यांची व्यवस्था तहसीलदार कार्यालय करेल, असेही ते म्हणाले.

 

Web Title: CoronaVirus Lockdown: Shops will be sealed if rules are not followed, Sawantwadi mayor warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.