corona virus : शिष्यवृत्ती परीक्षा ; ६८५० विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 01:30 PM2020-09-23T13:30:21+5:302020-09-23T13:37:09+5:30

पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल ७ महिन्यांचा कालावधी होत आला तरी लागलेला नाही. त्यामुळे ही परीक्षा दिलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६८५० विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

corona virus: scholarship examination; 6850 students awaiting results! | corona virus : शिष्यवृत्ती परीक्षा ; ६८५० विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत !

corona virus : शिष्यवृत्ती परीक्षा ; ६८५० विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत !

Next
ठळक मुद्देइयत्ता ५वी, ८ वी ची शिष्यवृत्ती परीक्षेला कोरोनाचा फटकासिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सुधीर राणे

कणकवली : पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल ७ महिन्यांचा कालावधी होत आला तरी लागलेला नाही. त्यामुळे ही परीक्षा दिलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६८५० विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

संपूर्ण राज्यभरातून सुमारे १० लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. हे सर्व विद्यार्थी या परीक्षेचा निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. या परीक्षेसाठी तयार केलेली उत्तरपत्रिका ओएमआर पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाते. त्यामुळे फारसे मनुष्यबळ उत्तरपत्रिका तपासणीसाठी लागत नाही. मात्र, सात महिन्यांचा कालावधी परीक्षा घेऊन पूर्ण झाला असूनही अजूनही निकाल लागलेला नाही. त्यासाठी कोरोनाचा वाढता संसर्गही कारणीभूत आहे. असे सांगितले जात आहे.

राज्यात २२ मार्चपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. या लॉकडाऊनमध्ये कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करावे, असे आदेश शासनाने दिले होते. त्याचा फटका शिक्षण विभागाच्या कामकाजाला बसला असून त्याचा परिणाम शिष्यवृत्ती परीक्षा निकालावर झाला आहे.

मात्र, लॉकडाऊन उठविल्याने आतातरी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागेल का ? असा सवाल आता विद्यार्थी व पालकांकडून विचारला जात आहे. या परीक्षेनंतर झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल उशिरा का होईना, लागलेला आहे. मात्र, या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अजून लागलेला नाही.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यापूर्वी ऑगस्ट त्यानंतर सप्टेंबरमध्ये या परीक्षेचा निकाल लागेल, असे जाहीर केले होते. मात्र, तसे झालेले नाही. राज्यभरातून ५ वीतील सुमारे ५ लाख ७४ हजार तर आठवीतील ३ लाख ९७ हजार विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ वीतील २५८८ व ८ वीतील ४२६२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी या निकालासंदर्भात संवाद साधला असता, ऑक्टोबर मध्ये निकाल जाहीर होईल, असे सांगण्यात आले.

निकालाकडे लागले डोळे !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६२० विद्यार्थी ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील २५८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ३२ विद्यार्थी गैरहजर होते. ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला ४३०२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ४२६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ४० विद्यार्थी गैरहजर होते. अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. परीक्षेला बसलेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे निकालाकडे डोळे लागले आहेत.

Web Title: corona virus: scholarship examination; 6850 students awaiting results!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.