नगराध्यक्ष-मोर्चेकऱ्यात हमरातुमरी, विकास आराखड्याविरोधात भाजपा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 01:38 PM2020-03-10T13:38:55+5:302020-03-10T13:43:24+5:30

भाजपचा शहर विकास आराखड्याबाबतचा मोर्चा पालिकेवर धडकल्यावर निवेदन स्वीकारण्यास गेलेल्या नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या अरविंद मोंडकर व सुदेश आचरेकर यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्ष आपली बाजू मांडत असताना तुम्ही काहीच बोलू नका, तुमचा आम्ही धिक्कार करतो अशा शब्दात मोंडकर यांनी अटकाव केला.

BJP leader agitated against rally, development plan in city president-front | नगराध्यक्ष-मोर्चेकऱ्यात हमरातुमरी, विकास आराखड्याविरोधात भाजपा आक्रमक

मालवण पालिकेवर भाजपच्यावतीने विकास आराखड्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. यावेळी महेश कांदळगावकर-अरविंद मोंडकर आणि सुदेश आचरेकर यांच्यात जोरदार हमरातुमरी झाली.

Next
ठळक मुद्देनगराध्यक्ष-मोर्चेकऱ्यात हमरातुमरी, विकास आराखड्याविरोधात भाजपा आक्रमक पालिका आवारात वातावरण काहीकाळ तंग

मालवण : भाजपचा शहर विकास आराखड्याबाबतचा मोर्चा पालिकेवर धडकल्यावर निवेदन स्वीकारण्यास गेलेल्या नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या अरविंद मोंडकर व सुदेश आचरेकर यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्ष आपली बाजू मांडत असताना तुम्ही काहीच बोलू नका, तुमचा आम्ही धिक्कार करतो अशा शब्दात मोंडकर यांनी अटकाव केला.

यावेळी आक्रमक बनलेल्या नगराध्यक्षांनी मी जनतेच्या सोबत आहे. माझ्या जनतेला विकास आराखड्यात अपेक्षित असलेले बदल करण्यास मी कटिबद्ध आहे असे सांगितले. यावेळी कांदळगावकर-मोंडकर यांच्यात जोरदार हमरातुमरी झाली. त्यामुळे पालिका आवारात काहीकाळ वातावरण तंग बनले होते.

दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आणत भाजपने घोषणाबाजीसाठी आणलेला ध्वनिक्षेपक बंद केला.

मोर्चाच्या ठिकाणी गोंधळ उडाल्याने उपस्थित नागरिकांनी तेथून काढता पाय घेतला. अन्यायकारक शहर विकास आराखड्यावरून नगराध्यक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवून भाजपने आराखड्याविरोधात काढलेल्या मोर्चाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला नाही.

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि अरविंद मोंडकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. भरड दत्त मंदिर येथून बाजारपेठमार्गे पालिका असा निघालेल्या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या सर्वपक्षीय मोर्चात भाजप, काँग्रेस आणि मनसे हे तीनच पक्ष सहभागी झाले होते. तर अनुपस्थित राहिलेले भाजपचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गटनेते गणेश कुशे हे चर्चेचा विषय बनले.

भाजपच्यावतीने आयोजित केलेला मोर्चा पालिकेवर धडकला. पालिका आवारात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्याधिकारी जयंत जावडेकर व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी आम्ही निवेदन देणार नाही, सर्वप्रथम आमच्या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावी, अशी विनंती केली.

यावर मुख्याधिकारी जावडेकर यांनी उपस्थितांना आराखड्याबाबतची प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, महेश जावकर, बाबा मोंडकर, नाना पारकर यांच्यासह काही नागरिकांनी आपली भूमिका प्रशासनासमोर मांडली.

भाषणबाजीमुळे नागरीक विखुरले

मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यास आलेल्या मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनी मोर्चेकऱ्यांना कार्यालयात येण्याची विनंती केली. मात्र मोंडकर यांनी आम्ही उन्हातच राहणार आहोत. आम्हाला एसी केबिनमध्ये येऊन काही बोलायचे नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांची एका मागून एक भाषणे सुरू झाल्यानंतर मोर्चात आवाहन करून सहभागी झालेले नागरिक विखुरले गेले. मोर्चाची सांगता होईपर्यंत पालिका आवारात तुरळक नागरिक उपस्थित होते.

नागरिकांनी व्यक्त केली नाराजी

नगराध्यक्षांना त्यांची भूमिका स्पष्ट करू न दिल्याने मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मोंडकर यांचे रौद्ररूप पाहून पोलिसांनी ध्वनिक्षेपक बंद केला. यावेळी शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत मोंडकर हे मनमानी करत आहेत. नगराध्यक्ष बोलले तर वस्तुस्थिती समोर येईल या भीतीनेच आचरेकर यांनी बोलायला दिले नाही, असा आरोप केला.
 

Web Title: BJP leader agitated against rally, development plan in city president-front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.