भगवती मंदिराची दानपेटी फोडली, धामापूरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 04:13 PM2020-06-03T16:13:37+5:302020-06-03T16:15:06+5:30

मालवण तालुक्यातील धामापूर येथील श्री देवी भगवती मंदिरातील दानपेटी सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कोयता, टिकाव व पहारीच्या सहाय्याने फोडून आतील सुमारे दहा ते बारा हजार रुपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली आहे.

 Bhagwati temple donation box broken, incident in Dhamapur | भगवती मंदिराची दानपेटी फोडली, धामापूरमधील घटना

धामापूर भगवती मंदिरात सोमवारी रात्री चोरी झाली. या चोरीचा तपास करण्यासाठी श्वानपथकाला पाचारण केले होते.

googlenewsNext
ठळक मुद्दे भगवती मंदिराची दानपेटी फोडली, धामापूरमधील घटना १० ते १२ हजार रुपये लांबविले; श्वान, ठसेतज्ज्ञांद्वारे तपास सुरू

चौके : मालवण तालुक्यातील धामापूर येथील श्री देवी भगवती मंदिरातील दानपेटी सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कोयता, टिकाव व पहारीच्या सहाय्याने फोडून आतील सुमारे दहा ते बारा हजार रुपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली आहे.

मंदिरातील चोरीमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. ठसेतज्ज्ञ, श्वान पथकांच्या सहाय्याने सध्या तपास सुरू आहे. त्या अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धामापूर भगवती मंदिर परिसरातील रहिवासी राजेंद्र दाभोलकर हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी साडेपाच वाजता मंदिरात गेले असता नेहमी बंद असणारा मंदिराचा मुख्य दरवाजा त्यांना उघडा असल्याचे दिसून आले. त्यांना संशय आल्याने पुढे जाऊन पाहिले असता दरवाजाचे कुलूप तोडून खाली टाकल्याचे दिसले.

मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याची माहिती दूरध्वनीवरून मंदिराचे विश्वस्त दत्तात्रय देसाई यांना दिली. त्यानंतर दत्तात्रय देसाई, कान्होबा देसाई यांनी भगवती मंदिरात धाव घेतली आणि दूरध्वनीवरून पोलिसांना मंदिरातील चोरीची कल्पना दिली आणि तपासासाठी पोलिसांना पाचारण केले.

त्यानुसार पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, प्रसाद आचरेकर, कट्टा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी रुक्मांगत मुंडे, योगेश सराफदार, ठसेतज्ज्ञ संजय ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक विद्या कदम, के. टी. सोनावणे, श्वान पथक कर्मचारी एस. एस. देवळेकर, लुईस फर्नांडिस हे सर्वजण भगवती मंदिरात दाखल झाले. त्यांनी पाहणी करत पंचनामा केला.

यावेळी दत्तात्रय देसाई, कान्होबा देसाई, सुनील देसाई, जयप्रकाश देसाई, सचिन देसाई, हनुमंत धामापूरकर, सीताराम धामापूरकर, मंदिराचे पुजारी देवेंद्र धोपेश्वरकर, धनंजय धोपेश्वरकर, आत्माराम धामापूरकर, शशिकांत गावडे आदी उपस्थित होते.

अज्ञात चोरट्यांनी भगवती मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि मुख्य गाभाऱ्याच्या समोरील बंदिस्त भागाच्या कडेच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गाभाऱ्यासमोरील दानपेटीचा वरचा भाग टिकाव, कोयत्याच्या सहाय्याने उचकटून काढल्याचे दिसून आले.

रँबो श्वानाने ग्रामपंचायत चढावापर्यंत माग काढला

श्वान पथकातील रँबो श्वान मंदिरासमोरील तलावाच्या बंधाऱ्यावरून जात स्मशानभूमी परिसरातून वाट काढत मुख्य रस्त्यावर आला आणि कुडाळच्या दिशेने जात धामापूर ग्रामपंचायतीच्या अलीकडील चढावापर्यंत त्याने माग काढला. त्यानंतर ठसेतज्जांनी चोरी झालेल्या ठिकाणचे ठसे घेतले आणि पुढील तपासासाठी पाठविले आहेत.
 

Web Title:  Bhagwati temple donation box broken, incident in Dhamapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.