एकीकडे पाणीकपात तर दुसरीकडे गळती, साताऱ्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 05:22 PM2020-09-17T17:22:39+5:302020-09-17T17:23:36+5:30

शहापूर पाणी योजनेचे दोन्ही पंप नादुरुस्त असल्याने पालिकेकडून शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जात आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणच्या जलवाहिन्यांना गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. शहरात हा विरोधाभास पहावयास मिळत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

Water cut on one side and leakage on the other, picture of Satara | एकीकडे पाणीकपात तर दुसरीकडे गळती, साताऱ्यातील चित्र

एकीकडे पाणीकपात तर दुसरीकडे गळती, साताऱ्यातील चित्र

googlenewsNext
ठळक मुद्दे एकीकडे पाणीकपात तर दुसरीकडे गळती, साताऱ्यातील चित्र व्हॉल्व्ह व जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया

सातारा : शहापूर पाणी योजनेचे दोन्ही पंप नादुरुस्त असल्याने पालिकेकडून शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जात आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणच्या जलवाहिन्यांना गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. शहरात हा विरोधाभास पहावयास मिळत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. कासमधून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू असला तरी शहापूर योजनेत वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच शहापूर योजनेचा २०० एचपीचा पंप व त्यानंतर ७५ एचपीचा पंप अचानक बिघडला. या पंपांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

पाणी उपसा करणारे पंपच बिघडल्याने पाणी साठवण टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे पालिकेने शहरातील प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाणी कपातीच्या निर्णयावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली.

प्रशासनाकडून एकीकडे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहन केले जात आहे. मात्र दुसरीकडे शहरातील जलवाहिन्यांना व व्हॉल्व्हला लागलेली गळती प्रशासनाच्या नजरेस अद्यापही पडलेली नाही.
पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील तसेच शाहू चौकातील वॉल्व्हला सातत्याने गळती लागत आहे.

या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. शिवाय बोगदा परिसर, समर्थ मंदिर, शनिवार पेठ या भागातही अनेक नळांना तोट्या नसल्याने पाण्याची नासाडी होत आहे. पाणी बचतीचे आवाहन करीत असताना प्रशासनाने पाण्याचा अपव्यय थांबविणे देखील गरजेचे आहे. पालिकेने वॉल्व्ह व जलवाहिन्यांना लागलेली गळती तातडीने काढावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

गळतीवर फरशीचा उपाय

पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारा समोर एका व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या वॉल्व्हमधून दररोज पाण्याची नासाडी होत असते. परंतु पालिकेकडून या व्हॉल्व्हची गळती अद्यापही काढण्यात आली नाही. विशेष म्हणजे ही गळती लपविण्यासाठी त्यावर चक्क फरशीचा तुकडा ठेवण्यात आला आहे.

Web Title: Water cut on one side and leakage on the other, picture of Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.