सुटीच्या दिवशी पर्यटक सैराट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:25 AM2021-06-21T04:25:45+5:302021-06-21T04:25:45+5:30

पेट्री : शहराच्या पश्चिमेस सातारा-कास मार्गावर काही हौशी पर्यटक कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात न घेता नियमांचे ...

Tourist Sairat on holiday! | सुटीच्या दिवशी पर्यटक सैराट!

सुटीच्या दिवशी पर्यटक सैराट!

Next

पेट्री : शहराच्या पश्चिमेस सातारा-कास मार्गावर काही हौशी पर्यटक कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात न घेता नियमांचे उल्लंघन करून गर्दी करत फोटोसेशन करण्यात दंग होत आहेत. यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियम न पाळणाऱ्या अशा लोकांवर पोलिसांनी करडी नजर ठेवून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

सर्वत्र कोरोना विषाणूने मृत्यूचे तांडव माजवले असून या घातक विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव मुळासकट थोपविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभाग आटोकाट प्रयत्न करत आहे. नागरिक, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीची ठिकाणे बंद असतानादेखील काही हौशी व्यक्ती सातारा-कास मार्गावर फिरण्यास येऊन नियमांचे उल्लंघन करत फोटोसेशन करत आहेत. प्रेमीयुगुलही परिसरात येतानाचे चित्र दिसत आहे. तसेच काही तरुणाईकडून बाइक रायडिंगवर स्टंट तसेच हुल्लडबाजी होत आहे.

पावसामुळे कोसळणारे धबधबे व बहरलेला हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी आलेल्या काही हौशी व्यक्तींकडून नियमांचे उल्लंघन होत असून या घटनेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

चौकट : पर्यटकांकडून नियम पायदळी...

कास परिसरात फिरण्यास येणाऱ्यांकडून निसर्गाच्या समवेत फोटोसेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सिंग नाही, कोणाच्या तोंडाला मास्क नाही. यामुळे कोरोना संसर्गाचा फैलाव होण्याचा अधिक धोका आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

फोटो ओळ : सातारा-कास मार्गावरील कास पठार, तलाव परिसरात रविवारी पर्यटनास आलेल्या हौशी व्यक्तींकडून गर्दी करत सर्रास फोटोसेशन होत आहे.

(छाया : सागर चव्हाण)

Web Title: Tourist Sairat on holiday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.