महामार्गावरील टोलला नेटकऱ्यांचा ‘सोशल’ टोला --चळवळ निर्णायक टप्प्यावर ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:48 PM2019-11-16T23:48:32+5:302019-11-16T23:49:44+5:30

सुविधांचा अभाव, देखभालीकडे दुर्लक्ष, वृक्षारोपण व संवर्धनाबाबत निरुत्साहामुळे महामार्गाची दुरवस्था झाली. सुमारे चार वर्षांपूर्वी सहापदरीकरणाचे काम सुरू झाले आणि सातारकरांचे कंबरडेच मोडले. अर्धवट उड्डाणपूल, जागोजागची बाह्यवळणे जीवघेण्या अपघातांना निमंत्रण देणारी ठरली. त्यातच पावसाने या महामार्गाची चाळण केली.

Toll on the highway is the 'social' body of nets | महामार्गावरील टोलला नेटकऱ्यांचा ‘सोशल’ टोला --चळवळ निर्णायक टप्प्यावर ।

खासदार श्रीनिवास पाटील यांनी शुक्रवारी टोलविरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घडवून दिली.

Next
ठळक मुद्देलोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे प्रशासनावर वाढतोय दबाव

प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : खिळखिळ्या राष्ट्रीय महामार्गामुळे मेटाकुटीस आलेल्या सातारा जिल्ह्यातील नेटकऱ्यांनी नेटाने चालवलेले टोलविरोधी आंदोलन निर्णयात्मक टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे आंदोलनाचे बळ वाढले आहे. आंदोलनाच्या या टप्प्यात जिल्ह्यातील उर्वरित लोकप्रतिनिधींनी सहभाग घेऊन टोलला अखेरचा टोला द्यावा, अशी अपेक्षा जिल्ह्याच्या भूमिपुत्रांकडून व्यक्त होत आहे.

चौपदरीकरणाच्या सुरुवातीच्या काही वर्षांनंतर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा-पुणे दरम्यानच्या रस्त्याची दुर्दशा झाली. सुविधांचा अभाव, देखभालीकडे दुर्लक्ष, वृक्षारोपण व संवर्धनाबाबत निरुत्साहामुळे महामार्गाची दुरवस्था झाली. सुमारे चार वर्षांपूर्वी सहापदरीकरणाचे काम सुरू झाले आणि सातारकरांचे कंबरडेच मोडले. अर्धवट उड्डाणपूल, जागोजागची बाह्यवळणे जीवघेण्या अपघातांना निमंत्रण देणारी ठरली. त्यातच पावसाने या महामार्गाची चाळण केली.

प्रवासाचा वाढलेला वेळ, अपघातांची वाढती संख्या, वाहनांचे होणारे नुकसान तसेच माणसाची होणारी शारीरिक झीज, मानसिक त्रास यामुळे सातारकर पेटून उठले. ‘टोलविरोधी सातारी जनता’ या नावाने व्यापक जनआंदोलन उभे राहिले. विशेष म्हणजे हे आंदोलन समाज माध्यमातून व्यक्त होऊ लागले. त्यामुळे केवळ सातारा शहरच नव्हे तर राज्य आणि देशभर विखुरलेल्या सातारच्या भुमिपुत्रांची ताकद समाज माध्यमावर एकवटली.

‘लोकमत’ने या विषयाला वाचा फोडून पाठपुरावा सुरूकेला. विधानसभा निवडणुकीपूर्वी समाज माध्यमातून सुरू झालेली ही जनजागृतीची चळवळ अल्पावधीतच बाळसं धरू लागली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, माजी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आता थेट केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत सातारकरांनी धडक मारली.

केंद्रीय मंत्र्यांनी आंदोलकांना आश्वासन दिल्याने जिल्हावासीयांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. असे असले तरी केंद्र व भारतीय राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण या मार्गाचे ठोस काम करत नाहीत, तोपर्यंत जनता टोल भरणार नाही, या भूमिकेवर जिल्हावासीय ठाम आहेत.

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग केवळ सातारा-जावळी तालुक्यातून जात नाही. त्यामुळे वाई, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिण मतदार संघातील लोकप्रतिनिधींनी टोल व या रस्त्यावरील गैरसोयींबाबत भूमिका घ्यावी. या खराब रस्त्याचा त्रास फक्त सातारकरांबरोबरच जिल्हावासीयांना बसत आहे. टोलविरोधी आंदोलन ही एक व्यापक अराजकीय चळवळ आहे. सातारकर आणि पुणे यांचे जवळचे नाते आहेत. असंख्य सातारकर दररोज पुण्याला ये-जा करतात. त्यामुळे हे आंदोलन सर्वांचे सर्वांसाठी मोलाचे आहे. निमंत्रणाची वाट न पाहता एक नागरिक म्हणून चळवळीत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा ‘टोलविरोधी सातारी जनता’ चळवळीतर्फे केली जात आहे.


निवडणुकीतील उमेदवार गेले कोठे?
विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्ह्णात साठहून अधिक उमेदवार रिंगणात होते. मतदारांच्या प्रश्नांबाबत सर्वांनाच पुळका आला होता. त्यांच्या भाषणांतून तो दिसत होता. टोलविरोधी सातारी जनता हे आंदोलन सुरू झाल्यानंतर ही मंडळी कोठे गेली?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या उमेदवारांनी तरी किमान या आंदोलनाला प्रसिद्धीपत्रक काढून पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षाही जनतेतून व्यक्त होत आहे.


 

Web Title: Toll on the highway is the 'social' body of nets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.