लाचखोर मनवेची नार्को टेस्ट करा
By Admin | Updated: December 13, 2014 23:52 IST2014-12-13T23:52:34+5:302014-12-13T23:52:34+5:30
बाजार समितीत होतेय लूट : शंकर गोडसे यांनी केली मागणी

लाचखोर मनवेची नार्को टेस्ट करा
सातारा : ‘सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचा लाचखोर सचिव रघुनाथ मनवे याची नार्को टेस्ट करा,’ अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शंकर गोडसे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. बाजार समितीत शिपाई म्हणून लागलेला आणि आता सचिव पदापर्यंत गेलेला लाचखोर मनवे लाखोंची माया गोळा कशी करतो, परदेश वाऱ्या कशा करतो, असा सवालही गोडसे यांनी पत्रकात केला आहे.
शंकर गोडसे त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा बाजार समितीत शेतमालावर शासकीय नियमानुसार केवळ सहा टक्के आडत घेण्याचा नियम आहे. मात्र, रघुनाथ मनवे शेतमालावर १२ टक्के आडत घेत होता. आले, कांदा, बटाटा, घेवडा, भुसार माल यामध्ये काटामारी सुरू होती. आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने आवाज उठविला आणि सहा टक्के आडत घेण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी मनवेची चौकशी करण्याची मागणी आम्ही केली होती. बाजार समितीत लाचखोरांची मोठी साखळी आहे. व्यापारी आणि सचिवाचे साटेलोटे आहे.
रघुनाथ मनवे बाजार समितीत शिपाई म्हणून नोकरीस लागला आणि तो सचिव झाला. तो लाखो रुपयांची मालमत्ता जमा करतो, हे सारेच संशयास्पद आहे.
सर्वसामान्यांना हा प्रकार अचंबित वाटतो. मनवे बुद्धिबळाच्या पटलावरील लखपती प्यादा आहे, मात्र वजीर आणि लाचखोर प्यादी शोधून काढण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जावे, अशी विनंतीही गोडसे यांनी पोलिसांना केली आहे. (प्रतिनिधी)