जन्मभूमीच्या ओढीपोटी ‘सिडनी ते वाई’ ; दुचाकीवरून २२ हजार किलोमीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:00 AM2020-01-12T00:00:36+5:302020-01-12T00:42:47+5:30

आवड... मग ती कोणत्याही क्षेत्रामधील असो. ध्येय बाळगून तो साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहा, हा उद्देश घेऊन असीम रणदिवे या अवलियाला जन्मभूमीची ओढ निर्माण झाल्याने सिडनी, आॅस्ट्रेलिया ते वाई हा २२ हजार किलोमीटरचा प्रवास चक्क दुचाकीवरून पार केला.

'Sydney to Y' travels around the homeland | जन्मभूमीच्या ओढीपोटी ‘सिडनी ते वाई’ ; दुचाकीवरून २२ हजार किलोमीटरचा प्रवास

जन्मभूमीच्या ओढीपोटी ‘सिडनी ते वाई’ ; दुचाकीवरून २२ हजार किलोमीटरचा प्रवास

Next
ठळक मुद्दे। शिरवळकरांच्या स्वागताने असीम भारावला

मुराद पटेल ।
शिरवळ : प्रवास करण्याची आणि जन्मभूमीला येण्याची ओढ निर्माण झाल्याने सिडनी (आॅस्ट्रेलिया) येथून एका अवलियाने लाखो रुपयांच्या नोकरीचा राजीनामा देऊन चक्क दुचाकीवरून २२ हजार किलोमीटरचे अंतर कापत वाई गाठली.
आवड... मग ती कोणत्याही क्षेत्रामधील असो. ध्येय बाळगून तो साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहा, हा उद्देश घेऊन असीम रणदिवे या अवलियाला जन्मभूमीची ओढ निर्माण झाल्याने सिडनी, आॅस्ट्रेलिया ते वाई हा २२ हजार किलोमीटरचा प्रवास चक्क दुचाकीवरून पार केला. विशेष म्हणजे, या अवलियाने आपल्या सोशल साईटवर मजेदार ‘सेवन डेज वन शॉवर’ हे ब्रीदवाक्य लिहित हा प्रवास केवळ सहा महिन्यांमध्ये पार केला आहे.
रणदिवे यांचा जन्म वाई येथे झाला असून, त्यांचे वडील आयटी क्षेत्रातील नोकरीत असल्याने १९८७ मध्ये ओमान देशात स्थायिक झाले. असीम रणदिवे यांचे शिक्षण १९९५ पर्यंत ओमान याठिकाणी झाले. त्यानंतर सिडनीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका नामंकित आयटी कंपनीमध्ये नोकरी लागल्याने तेथेच तो स्थायिक झाला होता. नोकरी करत असताना आपल्या मायभूमी असलेल्या भारतात जाण्याची ओढ लागली होती. त्यातही महाराष्ट्रातील लोकांना जाणून घेण्याची व जन्मभूमी असणाऱ्या दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या वाई याठिकाणी जाण्याची उत्सुकता होती.
मग यासाठी त्याने चक्क लाखो रुपयांच्या नोकरीचा राजीनामा दिला. दहा वर्षे नोकरी करीत असताना पगारातून बाजूला जमा केलेल्या रकमेतून जन्मभूमी गाठण्याचा निर्णय घेत जून २०१९ मध्ये दुचाकीवरून सिडनी ते महाराष्ट्रातील वाई हा पल्ला गाठण्याचा निर्णय घेत या प्रवासाला सुरुवात केली.
असीम रणदिवे नुकताच शिरवळ, ता. खंडाळा येथे पोहचल्यानंतर उद्योजक ललित खोपडे, दिनेश भरगुडे, वसीम काझी, डॉ. सुनील धुमाळ, शैलेश गोडबोले, पराग वाघ, अभी मालुसरे, वसीम फरास यांनी त्याचे स्वागत केले. शिरवळकरांनी केलेल्या प्रेमरुपी स्वागतामुळे असीमही भारावून गेला.

  • असा केला प्रवास...

असीम रणदिवे हा दुचाकीवरून सिडनी, रशिया, मंगोलिया, कजाकिस्तान, चीन, पाकिस्तान, वाघा बॉर्डरमार्गे भारतामध्ये प्रवेश करत हिमाचल, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, मुंबई, पुणे मार्गे असा तब्बल २२ हजार किलोमीटरचा पल्ला गाठत जन्मभूमी वाई शहरात पोहोचला.

 

माझी जन्मभूमी वाई असल्याने त्याठिकाणच्या नागरिकांना जाणून घेण्याची उत्सुकता मनात लहानपणापासून होती. एक अनोख्या पद्धतीने आपली जन्मभूमी असलेल्या वाईला भेट देण्याचा निर्णय घेतला. याठिकाणचे नागरिक जगामध्ये सर्वोत्कृष्ट असून, येथील मराठमोळा पाहुणचार वाखाणण्याजोगा आहे. यापूर्वी ६० देशांचा दुचाकीवरून फिरण्याचा विक्रम नोंदवला आहे. येत्या मार्च २०२० पासून काहीच दिवसांपूर्वी आपल्या पत्नीसोबत अमेरिकेबरोबर युरोप खंडाचा तब्बल २५ हजार किलोमीटरचा दुचाकीवरून प्रवास करण्याचा निश्चय केला आहे.
- असीम रणदिवे, प्रवासी

Web Title: 'Sydney to Y' travels around the homeland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.