उसामुळे शेतकऱ्यांचे पारंपरिक पिकांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:39 AM2021-04-16T04:39:24+5:302021-04-16T04:39:24+5:30

माण तालुक्याच्या पूर्वेकडील परिसरात दिवसेंदिवस भुईमूग पीक क्षेत्रामध्ये घट होत चालली असून, तलाव असलेल्या वडजल, देवापूर हिंगणी, महाबळेश्वरवाडी, बनगरवाडी, ...

Sugarcane causes farmers to neglect traditional crops | उसामुळे शेतकऱ्यांचे पारंपरिक पिकांकडे दुर्लक्ष

उसामुळे शेतकऱ्यांचे पारंपरिक पिकांकडे दुर्लक्ष

Next

माण तालुक्याच्या पूर्वेकडील परिसरात दिवसेंदिवस भुईमूग पीक क्षेत्रामध्ये घट होत चालली असून, तलाव असलेल्या वडजल, देवापूर हिंगणी, महाबळेश्वरवाडी, बनगरवाडी, कुरणेवाडी वरकुटे-मलवडी गावातील काही शेतकऱ्यांनी साधारणतः २१० हेक्टरवर उन्हाळी भुईमुगाची लागवड केली आहे. तर फक्त वरकुटे-मलवडीतील एका शेतक-याने एकरभर क्षेत्रात सोयाबीनचे पीक घेतले आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत भुईमूग लागवडीत निम्म्यापेक्षा जास्त पटीने घट झाली आहे.

दरवर्षी उसाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी वर्गाचे पारंपरिक तसेच उन्हाळी पीक उत्पादनाकडे दुर्लक्ष होत चालले आहे.

इतर पिकांच्या तुलनेत ऊस पिकाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पारंपरिक पीक क्षेत्राचे उत्पादन घटत चालले आहे. सद्य:स्थितीत माण तालुक्यातील पूर्व भागात जानेवारीमध्ये उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी झाली आहे. कृषी खात्याकडून मिळालेल्या उपलब्ध माहितीनुसार यावर्षी भुईमूग पिकांच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे.

गतवर्षी ३५० हेक्टरवर असलेले ऊस पीक यंदा ७०० हेक्टरपर्यंत वाढले गेले आहे. भुईमूग व सोयाबीन पीक क्षेत्रात सातत्याने घट झाल्याने यंदा बाजारपेठेत खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे.

कोट

दरवर्षी शेतकरी वर्गाकडून उन्हाळी हंगामात भुईमूग तसेच अन्य भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षांपासून माण तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने, यंदा मात्र ऊस पीक क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. शेतकरी वर्गाने खरीप व रब्बी हंगामातही पारंपरिक पिकाकडे दुर्लक्ष करून ऊस पीक उत्पादनावर जास्त भर दिला आहे.

....जालिंदर शिंदे , कृषी सहायक, माण तालुका

फोटो : बनगरवाडी येथील कुंडलीक आनुसे या शेतकऱ्याचे बहरलेले भुईमूग पिकाचे क्षेत्र.

Web Title: Sugarcane causes farmers to neglect traditional crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.