कडक लॉकडाऊनच्या भीतीमुळे सातारकर रस्त्यावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 11:29 AM2021-04-14T11:29:31+5:302021-04-14T11:37:18+5:30

corona virus Sataranews : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य शासन कडक लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता असल्याने सातारकर मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. यामुळे भाजी मंडई, तसेच किराणा दुकानातही गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचेच दिसून येत आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळपर्यंत दुकानात खरेदीसाठी गर्दी होती.

Satarkar on the road due to fear of severe lockdown ... | कडक लॉकडाऊनच्या भीतीमुळे सातारकर रस्त्यावर...

कडक लॉकडाऊनच्या भीतीमुळे सातारकर रस्त्यावर...

Next
ठळक मुद्देकडक लॉकडाऊनच्या भीतीमुळे सातारकर रस्त्यावर...सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : किराणा दुकानांवर सायंकाळपर्यंत गर्दी

सातारा : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य शासन कडक लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता असल्याने सातारकर मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. यामुळे भाजी मंडई, तसेच किराणा दुकानातही गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचेच दिसून येत आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळपर्यंत दुकानात खरेदीसाठी गर्दी होती.

मागील एक वर्षापासून कोरोना महामारीचे संकट आहे. पहिल्या लाटेत जवळपास सहा महिने लॉकडाऊन होते. तेव्हा कुठे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाले. कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर सर्वांनाच दिलासा मिळाला. त्यानंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केल्यानंतर पूर्वीप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले, तर नागरिकांनाही कोरोनाचे सोयरसुतक वाटले नाही. सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमही पायदळी तुडविले गेले. त्यातूनच आताची परिस्थिती उद्भवली आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही बाधित मोठ्या संख्येने सापडू लागले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने मागील आठवड्यापासून काही निर्बंध घातले; पण कोरोना रुग्ण काही केल्या कमी होईनात. त्यामुळे कडक लॉकडाऊनचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत. यामुळे कदाचित येत्या एक-दोन दिवसांत लॉकडाऊन जाहीर होईल. यामुळे सातारकर खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले आहेत.

जिल्ह्यात शनिवार आणि रविवारच्या वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला; पण सोमवारी सातारकर, तसेच जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. विशेष करून किराणा दुकान आणि मंडईत भाज्या खरेदीसाठी गर्दी दिसून आली. सातारा शहरात तर सकाळी १० वाजल्यापासून नागरिक रस्त्यावर आले होते. वाहनेही मोठ्या संख्येने रस्त्यावर होती. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबल्याचे चित्र दिसून आले. शहरातील राजवाडा येथील भाजी मंडईत तर खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती. असेच चित्र किराणा दुकानात दिसून आले. रात्री उशिरापर्यंत गर्दी होती.

मंगळवारीही सातारकर खरेदीसाठी बाहेर पडले. कदाचित दोन दिवसांत लॉकडाऊन जाहीर झाले तर अडचण नको म्हणून अनेकांनी किराणा दुकानातून महिनाभर पुरेल एवढे साहित्य खरेदी केले, तर काहींनी पुढे समस्या नको म्हणून मेडिकलमधून आगाऊ औषधी घेतली. एकंदरीतच कडक लॉकडाऊनच्या भीतीमुळे सातारकर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत; पण सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही, हेही यानिमित्ताने दिसून येत आहे.

पावसातही खरेदीसाठी नागरिक थांबून...

सातारा शहरात मंगळवारी पावणे पाचच्या सुमारास वळवाचा पाऊस सुरू झाला. तरीही नागरिक दुकान, तसेच निवारा असेल तेथे थांबून होते. पावसाची उघडीप होताच पुन्हा दुकानात खरेदीसाठी गेले.


कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य शासन कडक निर्बंध लावण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत लॉकडाऊनचे चित्र स्पष्ट होईल, असे वाटते. त्यामुळे काही दिवस तरी घराबाहेर पडता येणार नाही. यासाठी महिनाभर पुरेल एवढे किराणा सामान, तसेच गरजेच्या वस्तूही खरेदी केल्या आहेत.
- रामचंद्र पवार,
नागरिक

Web Title: Satarkar on the road due to fear of severe lockdown ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.