Satara Municipality: Road waste .. Ann the spot penalty | सातारा नगरपालिका : रस्त्यावर कचरा.. आॅन दि स्पॉट दंड

सातारा नगरपालिका : रस्त्यावर कचरा.. आॅन दि स्पॉट दंड

ठळक मुद्देसातारा नगरपालिका : रस्त्यावर कचरा.. आॅन दि स्पॉट दंडदोन दिवसांत सहाजणांवर कारवाई; शहर स्वच्छतेसाठी मोहीम

सातारा : घंटागाडीऐवजी सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकून शहराचे सौंदर्य बकाल करणाऱ्यांवर आता आॅन दि स्पॉट कारवाई सुरू करण्यात आली आहे. सातारा पालिकेने दोन दिवसांत सहाजणांवर कारवाई करून प्रत्येकी १८० रुपये दंडही वसूल केला आहे. या कारवाईची नागरिकांनी धास्ती घेतली असून, कारवाई आणखीन तीव्र केली जाणार आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. या अभियानांर्तगत सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, कचऱ्यांची ओला व सुका अशी वर्गवारी न करता तो तसाच घंटागाडीत टाकणे, सस्त्यावर थुंकणे, लघुशंका करणे अथवा शौच करणाऱ्या व्यक्तींकडून दंड आकारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने सर्व नगरपालिका व नगरपंचायतींना दिले आहेत.

सातारा पालिकेने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. कारवाईच्या पहिल्या दिवशी चिटणीस चौकातील शशिकला घाडगे या महिलेवर तर दुसऱ्या दिवशी इतर पाच जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

संबंधितांकडून जागेवरच १८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील वीस प्रभागांच्या स्वच्छतेची जबाबदारी वीस मुकादमांकडे सोपविण्यात आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित मुकादमांना पावती पुस्तक देऊन त्यांना कारवाईचे अधिकार दिले आहेत. पालिकेच्या या मोहिमेची नागरिक धास्ती घेऊ लागले असून, याचा चांगला परिणाम शहर स्वच्छतेवर दिसून येणार आहे.

सातारा शहरातून दररोज ६० ते ७० टन ओला व सुका कचरा संकलितकेला जातो. ४० घंटागाड्यांच्या माध्यमातून हे काम दररोज सुरू असते. शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात असताना नागरिकांची रस्त्यावर कचरा टाकण्याची मानसिकता मात्र बदलत नाही. कचरा कुंडीच्या जागी अथवा रस्त्यावर येता-जाता कचरा टाकला जातो. त्यामुळे शहराचे सौंदर्य बकाल होत आहे. पालिकेने सुरू केलेल्या या कारवाईमुळे विघ्नसंतोषी नागरिकांवर जरब बसणार आहे.
 

पालिकेकडून जनजागृती करूनही काही नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. तर काही ओला व सुका अशी वर्गवारी न करता तो घंटागाडीत टाकतात. अशा कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करताना पालिकेची दमछाक होते. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, शहर स्वच्छ व सुंदर राहावे, यासाठीच दंडात्मक कारवाई हाती घेण्यात आली आहे. पुढे ही मोहीम आणखी प्रभावीपणे राबविली जाईल.
- संचित धुमाळ,
उपमुख्याधिकारी, सातारा पालिका

 

Web Title: Satara Municipality: Road waste .. Ann the spot penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.