सावधान; यवतेश्वर घाटातून प्रवास करताय? घाटातील वाहतूक बनतीयं धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 05:04 PM2021-12-03T17:04:34+5:302021-12-03T17:08:20+5:30

सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ढासळल्याची तसेच नादुरुस्त परिस्थिती आहे. यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे.

The question of safety is on the table Poor condition of protective walls in Yavateshwar Ghat | सावधान; यवतेश्वर घाटातून प्रवास करताय? घाटातील वाहतूक बनतीयं धोकादायक

सावधान; यवतेश्वर घाटातून प्रवास करताय? घाटातील वाहतूक बनतीयं धोकादायक

Next

पेट्री : सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात (Yavateshwar Ghat) बहुतांशी ठिकाणी संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ढासळल्याची तसेच नादुरुस्त परिस्थिती आहे. त्यामुळे या घाटातील होणारी वाहतूक अधिकाधिक धोकादायक बनत चालली असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे.

शहराच्या पश्चिमेस कास, बामणोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असल्याने या परिसरात फिरायला जाण्यासाठी साताऱ्याहून यवतेश्वर घाटमार्गे प्रवास करावा लागतो. येथून सतत वर्षभर वाहतूक सुरू असते. तसेच कित्येक खासगी वाहने, अवजड मालाची वाहने, महाविद्यालयीन तरुण, शाळकरी मुले, नोकरदारवर्गाचीदेखील या परिसरातून सतत रहदारी असते. शनिवार, रविवार, उन्हाळी, दिवाळी सुटीत तसेच जोडून सुटी आल्यास मोठ्या प्रमाणावर यामार्गे वाहतूक सुरू असते.

दोन दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी मुसळधार पाऊस व प्रचंड धुके तर दुसरीकडे दुरवस्थेत असलेले संरक्षक कठडे अशा बिकट परिस्थितीत वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे घाटातील संरक्षक कठड्यांच्या दुरुस्तीची कामे तत्काळ करण्यात यावीत, असे वाहनचालकांतून बोलले जात आहे.

बहुतांशी ठिकाणी साधारण दहा ते बारा ठिकाणी ढासळलेले कठडे व नादुरुस्त कठड्यांची दुरुस्ती जैसे थे आहे. यामुळे संरक्षक कठड्यांची दुरुस्ती व काही ठिकाणी नव्याने बांधकाम करण्याची तसेच रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुतर्फा रिफ्लेक्टर बसविण्याची, सूचना फलक लावण्याची मागणी वाहनचालकांतून जोर धरत आहे.

स्टंट अन् हुल्लडबाजीचे वाढते प्रमाण !

घाटातून प्रवास करताना काहीजण स्टंट तसेच हुल्लडबाजी करताना दिसतात. कित्येक पर्यटक कठड्यांवर उभे राहून फोटो सेशन करतात; परंतु आपण उभे असलेल्या कठड्यांची परिस्थिती खालून कशी आहे. याचा अंदाज येत नाही. मधात मोडकळीस आलेल्या कठड्यांचा अंदाज न आल्यास तोल जाऊन एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही कठड्यांना झुडपांचा विळखा बसल्याने कठडे दिसत नाहीत. कोणतीही विपरित घटना घडण्याअगोदर संबंधित विभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक, पर्यटक, स्थानिकांतून होत आहे.

घाटात ठिकठिकाणी संरक्षक कठड्यांची झालेली दुरवस्था व ज्या ठिकाणी कठडेच गायब आहेत तसेच काही कठड्यांची उंची कमी आहे, अशा ठिकाणी कठड्यांची दुरुस्ती व नव्याने संरक्षक कठडे तत्काळ बांधण्यात यावेत. -आदित्य जाधव, वाहनचालक, सातारा

Web Title: The question of safety is on the table Poor condition of protective walls in Yavateshwar Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.