चार दशकात केवळ एकच महिला आमदार :साताऱ्यातील चित्र केवळ १८ जणींनी दाखल केली उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 10:51 PM2019-10-11T22:51:48+5:302019-10-11T22:57:15+5:30

यापैकी फलटणमध्ये कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढवली नाही. माण, जावळी, पाटण आणि क-हाड उत्तर या मतदारसंघांत केवळ प्रत्येकी एकाच महिला उमेदवाराने निवडणूक लढविली आहे.

 Only one woman legislator in four decades: a picture of Satara | चार दशकात केवळ एकच महिला आमदार :साताऱ्यातील चित्र केवळ १८ जणींनी दाखल केली उमेदवारी

चार दशकात केवळ एकच महिला आमदार :साताऱ्यातील चित्र केवळ १८ जणींनी दाखल केली उमेदवारी

Next
ठळक मुद्देकल्पनाराजे भोसले, वर्षा देशपांडे यांचाही समावेश

प्रगती जाधव- पाटील ।
सातारा : महिलेच्या हाती सत्तेची दोरी देण्यात सातारा जिल्हा बराच मागं असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. गेल्या चाळीस वर्षांत कोरेगाव मतदारसंघातून डॉ. शालिनीताई पाटील वगळता कोणीही महिला आमदार झाली नाही. चार दशकांत जिल्ह्यातील केवळ १७ महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अपवाद वगळता प्रवाहातील मुख्य पक्षांनी महिलांना उमेदवारीही दिली नसल्याचे दिसत आहे.

सातारा जिल्ह्यात फलटण, वाई, कोरेगाव, माण, क-हाड उत्तर, क-हाड दक्षिण, पाटण आणि सातारा असे ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी फलटणमध्ये कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढवली नाही. माण, जावळी, पाटण आणि क-हाड उत्तर या मतदारसंघांत केवळ प्रत्येकी एकाच महिला उमेदवाराने निवडणूक लढविली आहे.

सातारा मतदारसंघातून राजघराण्यातील कल्पनाराजे भोसले यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली होती. त्यांना काँग्रेस पक्षाकडून लढणारे अभयसिंहराजे भोसले यांनी पराभूत केले. दलित महिला संघटनेच्या संस्थापिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी स्वाभिमानी पक्षाकडून २००९ मध्ये निवडणूक लढवली होती. तर २०१४ मध्ये काँग्रेसकडून रजनी पवार निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या. निवडणुकीत पराभूत झाल्या असल्या तरीही या तिघींनी आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहणं पसंद केलं.

काँग्रेस पक्षाची विचारसरणी मानणाºया कोरेगाव मतदारसंघाचे शंकरराव जगताप यांनी १९७८ ते १९९५ असे पाचवेळा प्रतिनिधित्व केलं. १९९० मध्ये पहिल्यांदा डॉ. शालिनीताई पाटील यांनी जनता दलातून अर्ज भरला. त्यांना ४४ हजार ६८८ मतं मिळाली. त्यानंतर १९९५ मध्ये अपक्ष लढून त्यांना ५३ हजार ८०७ मतं घेता आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी १९९९ मध्ये निवडणूक लढवून ६१ हजार ६९२ मतं मिळवत पहिल्यांदा विजय संपादन केला. त्यानंतर २००४ मध्येही त्या कोरेगावच्या आमदार झाल्या. २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांनी त्यांना पराभूत केलं.

शालिनीताई पाटील एकमेव विजेत्या!
पुरोगामी सातारा जिल्ह्यात राजकारणातील महिलांची ओळख ही प्रतीविधानसभा अर्थात जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंतच मर्यादित राहिली आहे. जिल्ह्यात चार दशकांत डॉ. शालिनीताई पाटील यांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही महिला उमेदवाराला स्वत:च्या नावापुढे आमदार लावता आले नाही. विशेष म्हणजे जनता दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शालिनीतार्इंना उमेदवारी देण्यात आली. दहा वर्षे अभ्यासू आमदार म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली.

फलटणला एकही अर्ज नाही
फलटण तालुक्यात नाईक-निंबाळकर घराण्याचं राजकीय वर्चस्व राहिलं आहे. १९८०, १९८५ आणि १९९० या तिन्ही वेळेला चिमणराव कदम विजयी झाले. १९७८ ला विजयसिंह नाईक-निंबाळकर आणि १९९५ ते २००४ असे तीनवेळा रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर रामराजेंमुळे दीपक चव्हाण यांना आता तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

फलटणच्या माहेरवाशीण आणि महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी या मतदारसंघातून लढण्याची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी राजकीय घडामोडीत त्यांनी माघार घेतली. तर आत्तापर्यंतच्या इतिहासात या मतदारसंघातून कोणाही महिलेने निवडणूक लढविली नाही.

या महिलांनी लढवली निवडणूक...

सातारा मतदारसंघ
वर्ष उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते

  • १९९० कल्पनाराजे भोसले शिवसेना ३८ हजार ७८३
  • १९९५ लता पुंडलिक जाधव वंदे मातरम सेवा ४३९
  • २००९ अलंकृता बिचुकले अपक्ष १ हजार ५३४
  • २००९ वर्षा देशपांडे स्वाभिमानी पक्ष ७ हजार ३४९
  • २०१४ रजनी पवार राष्ट्रीय काँग्रेस ७ हजार १८७

माण मतदारसंघ
१९९० कमल तुकाराम मस्के अपक्ष १ हजार ५३३
१९९५ नंदा बबन सावंत बसपा ३ हजार ४३८
२००९ संगीता पांडुरंग शेलार अपक्ष २ हजार ६६
कºहाड उत्तर मतदारसंघ
१९९५ इंदुबाई काकासोा पाटील अपक्ष ९२९
कºहाड दक्षिण मतदारसंघ
२००४ बनुबाई दगडू येवले अपक्ष २ हजार ८२१
२०१४ विद्युलता मर्ढेकर अपक्ष ५४७

वाई मतदारसंघ
वर्ष उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते
१९९० शारदा राजाराम चव्हाण अपक्ष १२८
२००४ कुमुदिनी कोंढाळकर भारतीय स्त्रीवादी पक्ष १ हजार २७८
२००९ सुधा संपत साबळे अपक्ष १ हजार ५३४
कोरेगाव मतदारसंघ
१९९० शालिनीताई पाटील जनता दल ४४ हजार ६८८
१९९५ शालिनीताई पाटील अपक्ष ५३ हजार ८०७
१९९९ शालिनीताई पाटील राष्ट्रवादी ६१ हजार ६९२ (विजयी)
२००४ शालिनीताई पाटील राष्ट्रवादी ६१ हजार ३२६ (विजयी)
२००९ शालिनीताई पाटील अपक्ष ४८ हजार ६२०
जावळी मतदारसंघ
१९९५ वनिता रामचंद्र बगाडे अपक्ष २२९
पाटण मतदारसंघ
१९९० विजयादेवी देसाई अपक्ष ४० हजार ००३
* फलटण मतदारसंघ (निरंक)


 

Web Title:  Only one woman legislator in four decades: a picture of Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.