जवानांची चिठ्ठी ना कोई संदेश...२५ दिवसांपासून संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 10:44 AM2019-09-03T10:44:16+5:302019-09-03T10:50:04+5:30

काश्मीरमध्ये आज कैक जवान देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथील संपर्क सेवा बंद केल्याने गेल्या २५ दिवसांपासून जवान व कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही.

No message from Jawans ... Contact has been lost for 3 days | जवानांची चिठ्ठी ना कोई संदेश...२५ दिवसांपासून संपर्क तुटला

जवानांची चिठ्ठी ना कोई संदेश...२५ दिवसांपासून संपर्क तुटला

Next
ठळक मुद्देजवानांची चिठ्ठी ना कोई संदेश...२५ दिवसांपासून संपर्क तुटलाकाश्मीर स्थितीमुळे जिल्ह्यातील कुटुंबीय व्याकूळ

स्वप्नील शिंदे

सातारा : ना मातृछत्र हरपल्याचे दु:ख, ना पुत्र प्राप्तीचा आनंद याची कोणतीही फिकीर न करता काश्मीरमध्ये आज कैक जवान देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथील संपर्क सेवा बंद केल्याने गेल्या २५ दिवसांपासून जवान व कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही. सातारा जिल्ह्यातील अशा हजारो जवानांच्या संदेशाची आस कुटुंबीयांना लागून राहिली असून, त्यांच्या मनामध्ये चिंतेचे काहूर माजले आहे.

सातारा जिल्ह्याला अनेक वर्षांपासून सैनिकी परंपरा लाभली आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक गावातील एकतरी तरुण सैन्यात कार्यरत आहे. प्रत्येक गावाच्या वेशीवर असलेल्या कमानी आणि शहिदांची स्मारके ही त्या जवानांच्या शौर्याची आठवण करून देतात. आजही भारतीय सैन्य, नौदल आणि वायूदलासह विविध फोर्समध्ये जिल्ह्यातील सुमारे ४० हजारांपेक्षा जास्त सैनिक कार्यरत आहेत.

केंद्र सरकारने राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याने जम्मू-काश्मीरमध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्यातील फोन, इंटरनेटसह सर्व संपर्क माध्यमे बंद केली आहेत. त्यामुळे तेथील लोकांचा संपर्क एकमेकांशी होत नाही. या निर्णयाच्या विरोधात स्थानिकांनी दगडफेक, निदर्शने केल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशा परिस्थितीमध्ये साताऱ्यातील सुमारे पाच हजार जवान जम्मू-काश्मीरमध्ये आपली सेवा बजावत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या प्रदीप यादव याच्या आईचे मागील आठवड्यामध्ये निधन झाले. तर सीआरपीएफमधील अमोल निकम यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

दु:खद आणि आनंददायी अशा दोन्ही घटनांची माहिती सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांपर्यंत पोहोचली नाही. मात्र, ते कोणतीही फिकीर न करता देशसेवा बजावत आहेत. त्यांच्यासारखे हजारो जवान गेल्या २५ दिवसांपासून आपल्या कुटुंबीयांशी बोलू शकले नाहीत. त्यांची खुशाली न कळल्याने गावाकडे त्यांच्या संदेशाची वाट पाहत बसलेली कुटुंबे कासावीस झाली आहेत. कधी मोबाईल, फोन अन् इंटरनेटची सेवा चालू होतेय, याची ते प्रतीक्षा करीत आहेत.


ते सध्या सीआरपीएफमध्ये आहेत. आमचा मुलगा अर्णवला रोज मोबाईलवर वडिलांशी व्हिडीओ कॉलिंग करण्याची सवय आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. त्यामुळे अर्णव शाळेत जाईना. पप्पांशी बोलल्याशिवाय शाळेत जाणार नाही, असे म्हणतोय.
-सुष्मिता पवार
जवानाची पत्नी, सातारा


पोराशी चार तारखीला बोलले होते, तवापासन त्याची खबरबात नाय. टीव्हीवर बघतो काश्मीरमध्ये रोज दंगा व्हतोय. काळजी लागून राहिली हाय. पोरगं कस हाय, त्याची चिंता लागलीय.
- उषा जाधव,
जवानाची माता, कऱ्हाड 

Web Title: No message from Jawans ... Contact has been lost for 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.