लग्नाचा बहाणा करून महिलेला परदेशात विकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:59 AM2020-01-23T11:59:24+5:302020-01-23T12:10:50+5:30

सातारा : लग्न लावून परदेशात गेल्यानंतर आपल्याला पाच लाखाला केवळ कामासाठी विकल्याचे समजताच साताऱ्यातील महिलेने परदेशातील एका महिलेच्या मदतीने ...

Marriage is sold to a woman abroad | लग्नाचा बहाणा करून महिलेला परदेशात विकले

लग्नाचा बहाणा करून महिलेला परदेशात विकले

Next
ठळक मुद्देलग्नाचा बहाणा करून महिलेला परदेशात विकलेसाताऱ्यातील महिलेची तक्रार : मिरज येथील चौघांवर गुन्हा

सातारा : लग्न लावून परदेशात गेल्यानंतर आपल्याला पाच लाखाला केवळ कामासाठी विकल्याचे समजताच साताऱ्यातील महिलेने परदेशातील एका महिलेच्या मदतीने आपली सुटका करून ती साताऱ्यात सुखरुप परतली.

संबंधित महिलेचा विश्वासघात करून तिला विकणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मिरज येथील चौघांवर तसेच तिला विकत घेणाऱ्या बहरिन देशातील एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

समीर बादशहा नदाफ, हमत बादशहा नदाफ, आरिफा बादशहा नदाफ, महम्मद शेख (रा. नदीवेस शास्त्री चौक परिसर, मिरज, जि. सांगली), अब्दुलहुसेन अली इब्राहिम ( बहरिन देश), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निलोफर शेख (वय ३२, रा. शनिवार पेठ, सातारा) यांचा विवाह २००३ मध्ये मिरज येथील मुनोवर हसन भंडारी याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली. मात्र, काही वर्षांनतर या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर निलोफर आपल्या मुलांसोबत मिरज येथेच स्वतंत्र राहू लागल्या. त्यांच्या भावजयीच्या घराजवळ राहणाऱ्या समीर नदाफ, त्याची आई राहमत, बहीण आरिफा व तिचा पती महम्मद हे सर्वजण तिच्या घरात आले.

त्यांनी सांगितले, महम्मद शेख यांचा बहरिन देशातील मित्र अब्दुलहुसेन अलि इब्राहिम यांची पत्नी मयत झाली असून त्याचा दुसरा विवाह करायचा आहे. त्याच्यासाठी आम्हाला निलोफर आवडली आहे. तो तिचा मुलांसह स्वीकार करेल. दुसऱ्या लग्नाची चर्चा करण्यासाठी निलोफर ही भावजयीसोबत साताऱ्यात आली.

घरातल्यांशी चर्चा केल्यानंतर नदाफ कुटुंबीयांना साताऱ्यात बोलावण्यात आले. त्यावेळी त्यांनी अब्दुलहुसेन हा बहरिन येथे पुढच्या आठवड्यात जाणार आहे. त्यापूर्वीच त्याचे लग्न करायचे आहे. तो चांगला असून आम्ही हमी देतो, असे त्यांनी निलोफरला सांगितले. त्यामुळे तिने लग्नास संमती दर्शवली.

२४ मार्च २०१९ रोजी निलोफरचे अब्दुलहुसेन याच्याशी साताऱ्यात लग्न झाले. लग्नानंतर तिचा पासपोर्ट व विजा नसल्याने निलोफरला मिरज येथील समीर नदाफ याच्या घरी राहण्यासाठी नेले. तेथे गेल्यानंतर समीरच्या घरी न नेता दुसरीकडे नेले.

पाच दिवसांनंतर अब्दुलहुसेन याने निलोफरला साताऱ्यात आईकडे आणून सोडले. त्यानंतर तो बहरिनला निघून गेला. काही दिवसांनंतर निलोरला त्यांनी विजा पाठवून दिला. १ जुलै २०१९ रोजी निलोफर एकटीच विमानाने बहरिनला गेली. तेथे गेल्यानंतर अब्दुलहुसेन याने तिला घरी नेले. घरात गेल्यानंतर तेथे अगोदरच तीन महिला होत्या. त्यांची भाषा निलोफरला समजत नव्हती.

दोन दिवसांनंतर अब्दुलहुसेन इब्राहिम याने निलोफरला कामासाठी बाहेर नेले. तेथील ऊन सहन होत नसल्याने निलोफरने कामास नकार दिला. त्यावेळी अब्दुलहुसेन याने तुला मी पाच लाख रुपयांना समीर व त्यांच्या नातेवाईकांकडून विकत घेतले आहे. त्यामुळे तुला काम करावेच लागेल, असे त्याने सांगितले. आपल्याला लग्नाचा बहाणा करून विकले असल्याचे निलोफरला समजल्यानंतर तिच्या पायाखालची वाळू सरकली.

आईने पाठविले विमानाचे तिकिट..

बहरिन देशातील एका महिलेच्या मोबाईलवरून निलोफरने साताऱ्यात आईला फोन केला. हा सारा प्रकार आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने बहरिन येथे राहणाऱ्या संबंधित महिलेच्या मोबाईलवर विमानाचे तिकिट पाठविले. त्या महिलेच्या मदतीने निलोफर ही २३ जुलै २०१९ रोजी गुपचुपणे बहरिनमधून अबुधाबी येथून मुंबईत आली. त्यानंतर ती साताऱ्यात सुखरुप पोहोचली.

प्रकृती बरी नसल्यामुळे तिला तक्रार देण्यास उशीर झाला. साताऱ्यात औषधोपचार घेतल्यानंतर निलोफरने समीर नदाफ व इतरांना फोन केला. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तुम्ही माझी फसवणूक केली आहे, असे तिने सांगताच संबंधितांनी तुला काय करायचे ते कर, अशी धमकी दिली. त्यामुळे निलोफरने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Web Title: Marriage is sold to a woman abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.