Low water reservoir in the dam; If the rain is long, the situation is serious | जिल्ह्यातील धरणांत नीचांकी पाणीसाठा ; पाऊस लांबला तर परिस्थिती गंभीर
जिल्ह्यातील धरणांत नीचांकी पाणीसाठा ; पाऊस लांबला तर परिस्थिती गंभीर

ठळक मुद्देपाच वर्षांचा आढावा : केवळ १४.८५ टीएमसी पाणी शिल्लक

सागर गुजर ।
सातारा : जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असतानाच धरणांतील पाणीसाठ्यानेही तळ गाठला आहे. धरणांमध्ये गेल्या पाच वर्षांतील निचांकी पाणीसाठा उरला आहे. कोयना, उरमोडी, कण्हेर, धोम, धोम-बलकवडी, तारळी, वीर या मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणी आहे. सर्व धरणांत मिळून केवळ १४.८५ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिले
आहे.

जिल्ह्यातील १९ लहान-मोठे व ३२ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या ११ जून रोजी ३२.८४ टीएमसी पाणी शिल्लक होते. याच तारखेला २०१४ मध्ये २२.३३ टीएमसी, २०१५ मध्ये ४०.२० टीएमसी, २०१६ मध्ये १६.४९ टीएमसी तर २०१७ मध्ये २१.०२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी म्हणजे केवळ १४.८५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. धरणांतील मृत पाणीसाठा वगळता हे पाणी उपयुक्त ठरणारे आहे. दरम्यान, कोयना धरणातून सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार रोज ३२०० क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे दिवसागणिक कोयना धरणातील पाणीसाठाही कमी होत आहे.

संपूर्ण जिल्ह्यावर पाणी संकट ओढावले आहे. उन्हाळी पाऊस पुरेसा पडलेला नाही. मान्सूनही लांबणीवर पडला असल्याने जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. जिल्ह्यातील २५५ गावे व ९९८ वाड्या-वस्त्यांवर तब्बल २९० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. ४ लाख ७९ हजार ४८३ लोक व २ लाख ३३ हजार पशुधन टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. माण, खटाव, कोरेगाव, जावळी, फलटण, वाई, पाटण, महाबळेश्वर, खंडाळा, सातारा, कºहाड एकूण २७ टँकर फिडिंग पॉर्इंट आहेत. या ठिकाणीही धरणांतून पाणी सोडले जात असून, धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला
आहे.

खटाव व माण या दोन तालुक्यांत उरमोडी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. कºहाडजवळच्या टेंभू प्रकल्पातूनही माण तालुक्यातील १६ गावांना पिण्याचे पाणी देण्यात आले आहे. दुष्काळग्रस्तांची तहान मोठ्या प्रकल्पांतून भागवली जात असली तरी आता या प्रकल्पांनीच तळ गाठल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी काटकसरीने पुरविण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. दुष्काळी भागातील येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी या छोट्या प्रकल्पांमध्ये तर पाण्याचा खडखडाट झाला आहे. मोरणा गुरेघर, उत्तरमांड, महू, हातगेघर, वांग-मराठवाडी हे प्रकल्पही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्या गावांना पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.


२०१६ मध्ये कोयनेत विदारक चित्र
यंदा कोयना धरणात ८.०८ इतके उपयुक्त पाणी शिल्लक आहे. मात्र, २०१६ मध्ये यापेक्षा विदारक परिस्थिती होती. तेव्हा कोयना धरणात केवळ ७.५८ टीएमसी पाणी शिल्लक राहिले होते. नंतर पावसाने साथ दिल्याने परिस्थितीत बदल झाला होता.
धरणनिहाय उपलब्ध पाणीसाठा टीएमसीमध्ये
कोयना धरण ८.०८, धोम ०.०६, धोम बलकवडी ०.१३, कण्हेर १.३५, उरमोडी ०.६९, तारळी १.७६, नीरा-देवघर ०.१९, भाटघर १.१६, वीर ०.५०, येरळवाडी ०, नेर ०.०४, राणंद ०, आंधळी ०, नागेवाडी ०.०३, मोरणा गुरेघर ०.४७, उत्तरमांड ०.२५, महू ०.०७, हातगेघर ०.०४, वांग मराठवाडी ०.०३, लघू प्रकल्प ०.११.


 


Web Title: Low water reservoir in the dam; If the rain is long, the situation is serious
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.