अतिवृष्टी : नुकसानग्रस्तांची ससेहोलपट, बाधित आहे; पण यादीत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 12:39 PM2021-11-24T12:39:32+5:302021-11-24T12:42:44+5:30

संजय पाटील कऱ्हाड : पाटण तालुक्यातील मिरगाववर जुलै महिन्यातील अतिवृष्टीत डोंगर कोसळला. दरडीखाली अनेकांचे संसार गाडले गेले. बाधितांना शासनाने ...

Large damage in heavy rains Is interrupted But not on the list | अतिवृष्टी : नुकसानग्रस्तांची ससेहोलपट, बाधित आहे; पण यादीत नाही!

अतिवृष्टी : नुकसानग्रस्तांची ससेहोलपट, बाधित आहे; पण यादीत नाही!

Next

संजय पाटील
कऱ्हाड : पाटण तालुक्यातील मिरगाववर जुलै महिन्यातील अतिवृष्टीत डोंगर कोसळला. दरडीखाली अनेकांचे संसार गाडले गेले. बाधितांना शासनाने मदतही दिली; पण काही दरडग्रस्त आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसान होऊनही त्यांची ससेहोलपट सुरू असून, नुकसानीचा पंचनामा करण्याचे सोपस्कारही प्रशासनाने पार पाडलेले नाहीत, हे दुर्दैव.

मिरगावमधील धोंडीराम दाजी बाकाडे हे गत तीन महिन्यांपासून प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवतायत. तलाठ्यांपासून प्रांताधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना ते हाथ जोडतायत. मदतीसाठी विनवणी करतायत. मात्र, त्यांचे ऐकून घ्यायला कुणालाही वेळ नाही. नुकसान होऊनही त्यांच्या नुकसानीची दखल कोणीही घेत नाही. मिरगावमध्ये धोंडीराम बाकाडे यांचे जुने घर होते. त्या घराच्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी त्यांनी पत्रे, लोखंडी पाईप, खांब यासह इतर साहित्य आणून टाकले होते. नवीन घरबांधणीला ते सुरुवात करणार होते; पण २३ जुलैच्या रात्री गावावर डोंगर कोसळला. या दरडीखाली सुरुवातीलाच असलेले धोंडीराम बाकाडे यांचे घर गाडले गेले. तसेच त्यांच्या घराचा प्लॉटही दरडीसोबत खाली घसरला.

या दुर्घटनेत गावातील चार घरे पूर्णपणे गाडली गेली. तसेच काही जणांचा मृत्यूही झाला. प्रशासनाने बाधितांच्या नुकसानीचे पंचनामे केले. त्यांना मदतही दिली. मात्र, धोंडीराम बाकाडे यांना कसलीच मदत मिळाली नाही. त्यांच्या नुकसानीचा पंचनामाही केला गेला नाही. त्यामुळे गत तीन महिन्यांपासून ते अस्वस्थ असून बाधितांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना आर्जव करतायत.

कारण... राजकारण..!

मिरगाव गावातील मोकळे प्लॉट असलेल्या तसेच घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रशासनाकडून निवारा शेड देण्यात आली आहेत. मात्र, धोंडीराम बाकाडे यांना शेडही दिले गेलेले नाही. केवळ राजकीय आणि वैयक्तिक द्वेषापोटी बाधितांच्या यादीतून नाव वगळले असल्याचा आरोप बाकाडे यांनी केला आहे.

मिरगावमध्ये माझे वडिलोपार्जित घर होते. मात्र, घर पूर्णपणे पडल्यामुळे ‘आठ अ’ उताऱ्यावर मोकळी जागा असा उल्लेख येतो. गावातील अन्य काही मोकळे प्लॉट असलेल्या ग्रामस्थांना निवारा शेड मिळाली आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा आहे. मात्र, बाधितांच्या यादीत माझे नावच नसल्यामुळे मला कसलाच लाभ मिळालेला नाही. - धोंडीराम बाकाडे, दरडग्रस्त, मिरगाव

मिरगावचा लेखाजोखा

५३१ : लोकसंख्या

१४६ : एकूण घरे

४० : पूर्णत: बाधित घरे

८ : अंशत: बाधित घरे

११ : दरडीखाली मृत

पूर्णत: बाधितांना...

दुर्घटनेतील पूर्णत: बाधित कुटुंबांना दीड लाख रुपये मदत व दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान शासनाकडून देण्यात आले आहे.

मयताच्या वारसांना...

१) राज्य शासनाकडून पाच लाख रुपये मदत देण्यात आली आहे.

२) केंद्र शासनाकडून दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

३) गोपींनाथ मुंडे अपघाती योजनेतून दोन लाख मिळणार आहेत.
 

धोंडीराम बाकाडे यांचे राहते घर मिरगावमध्ये नव्हते. त्यांचे कुटुंबीय नेचल गावामध्ये राहतात. त्यामुळे त्यांना निवारा शेडची आवश्यकता आहे, असे वाटत नाही. तसेच त्यांच्या नुकसानीचे कसलेही पुरावे आमच्यासमोर आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना मदत मिळालेली नाही. - तलाठी, मिरगाव

Web Title: Large damage in heavy rains Is interrupted But not on the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.