कराड पालिका : "पृथ्वीराजां" ची एन्ट्री, कोणासाठी धोक्याची घंटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:15 AM2021-04-17T11:15:05+5:302021-04-17T11:16:57+5:30

Karad Prithviraj Chavan Satara : कराड पालिकेत दोन वर्षांनंतर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी एन्ट्री केली. त्यांच्या फंडातून खरेदी केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण यावेळी त्यांच्या हस्ते झाले. चव्हाणांच्या स्वागताला राष्ट्रवादीसह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. पण काहींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे पृथ्वीराज यांची एन्ट्री कोणासाठी धोक्याची घंटी आहे; याबाबत शहरात चर्चा रंगू लागल्या आहेत.

Karad Corporation: Entry of "Prithviraj", alarm bell for whom! | कराड पालिका : "पृथ्वीराजां" ची एन्ट्री, कोणासाठी धोक्याची घंटी !

कराड पालिका : "पृथ्वीराजां" ची एन्ट्री, कोणासाठी धोक्याची घंटी !

Next
ठळक मुद्देकराड पालिका : ''पृथ्वीराजां'' ची एन्ट्री, कोणासाठी धोक्याची घंटी ! रुग्णवाहिका स्वीकारली, पण राजकीय आजाराचं काय ?

प्रमोद सुकरे

कराड : कराड पालिकेत दोन वर्षांनंतर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी एन्ट्री केली. त्यांच्या फंडातून खरेदी केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण यावेळी त्यांच्या हस्ते झाले. चव्हाणांच्या स्वागताला राष्ट्रवादीसह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. पण काहींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे पृथ्वीराज यांची एन्ट्री कोणासाठी धोक्याची घंटी आहे; याबाबत शहरात चर्चा रंगू लागल्या आहेत.

पालिकेच्या गत निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आघाडी रिंगणात उतरली. खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेचा जनशक्ती, यशवंत, लोकसेवा या तिन्ही आघाड्यांच्या नेत्यांना फायदा झाला. तांत्रिक अडचणीमुळे सर्वजण फक्त जनशक्ती आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुकीला सामोरे गेले एवढेच !

उमेदवार निश्चित करताना बऱ्याच घडामोडी घडल्या. अखेर उमेदवार निश्चित झाले. समोर राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी व भाजपचे उमेदवार असे तगडे आव्हान होते. चव्हाणांनी तळागाळापर्यंत उतरून प्रचार केला. जनशक्ती आघाडीला बहुमत मिळाले. नगराध्यक्ष मात्र भाजपच्या निवडून आल्या. निवडून आल्यानंतर बहुतांशी जनशक्तीच्या नगरसेवकांनी दोनच दिवसांत चव्हाणांकडे पाठ फिरवली. ती परवाच्या पालिकेतील पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यक्रमातही दिसून आली.

आता चार वर्षांत कराडच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. वर्षभरावर पालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे. इच्छुकांनी आत्तापासूनच जोर-बैठका सुरू केल्या आहेत. पण पृथ्वीराज चव्हाण यांची पालिकेतील एन्ट्री म्हणजे येत्या निवडणुकीत ते सक्रिय होणार असल्याचे संकेतच मानले जातात. त्यामुळे गत निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली विजय होऊन दगाफटका करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
खरंतर पाठीमागच्या पालिका निवडणुकीत काहींनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे हाताच्या चिन्हावर लढण्याचा आग्रह धरला होता. परंतु आघाड्यांच्या राजकारणात माहीर असलेल्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या गळी आघाडीचे राजकारण उतरवलं. पण निकालानंतर चव्हाणांना आपलं थोडं चुकलंच असं निश्चितच वाटलं असावं.

आपल्याच नगरसेवकांनी आपल्याकडे पाठ फिरवली ही वस्तुस्थिती असतानाही पृथ्वीराज चव्हाण आणि चेहऱ्यावर काही दाखवले नाही .पालिका हा विषय त्यांनी जरा दूरच ठेवला. पण नुकतेच कार्यक्रमाच्या निमित्ताने पालिकेत येऊन त्यांनी टायमिंग शॉट मारल्याचे बोलले जात आहे. आता यापुढील काळात पालिकेच्या पिचवर ते काय काय खेळी करणार हे पहावे लागेल.

यादव -पाटील गटाची अनुपस्थिती

पालिकेत बहुमतात असणाऱ्या जनशक्ती आघाडीतील गटनेते राजेंद्र यादव व उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाण पालिकेत आले असताना कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. पण आघाडीच्या माजी नगराध्यक्ष शारदा जाधव, नगरसेवक अतुल शिंदे आदींनी यावेळी आवर्जून हजेरी लावली होती .त्याचीही चर्चा सुरू आहे.

रुग्णवाहिका खरेदीला उशीर का?

गतवर्षी कोरोनाचे संकट आले तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांनी रुग्णवाहिकेसाठी कराड पालिकेला निधी दिला. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्यावर त्याची खरेदी झाली आहे. त्यासाठीही स्वतः चव्हाणांना प्रशासनाला धारेवर धरावे लागले. तेव्हा कुठे त्याला गती आली. रुग्णवाहिका खरेदीला झालेला उशीर हा राजकारणाचा भाग असल्याची चर्चा शहरात आहे. पालिकेने रुग्णवाहिका स्वीकारली, पण येथील काही नगरसेवकांना झालेल्या राजकीय आजाराचं काय? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

Web Title: Karad Corporation: Entry of "Prithviraj", alarm bell for whom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.