जावळी तालुका : गटशिक्षणाधिकारी चव्हाण यांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार
By Admin | Updated: December 12, 2014 23:43 IST2014-12-12T22:32:43+5:302014-12-12T23:43:48+5:30
चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी श्रेयवादाचा उतारा

जावळी तालुका : गटशिक्षणाधिकारी चव्हाण यांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार
जावळी तालुका : गटशिक्षणाधिकारी चव्हाण यांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार
सातारा / मेढा : जावळीचे गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या विरोधातील तक्रारीचा पाढा काही केल्या संपायला तयार नाही. एकीकडे विभागीय आयुक्त विकास देशमुख यांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले असतानाच या मुद्द्याला बगल देण्यासाठी त्यांनी काही शिक्षकांना हाताशी धरून दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय स्वत: घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाली आहे. चव्हाण यांच्या या कार्यपद्धतीविरोधात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आठवले गट) जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
रिपाइं जावळी तालुकाध्यक्ष संजय गाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चव्हाण यांनी सतरा शिक्षकांच्या बदल्या तोंडी आदेशाने नियमबाह्य केल्या आहेत. यामध्ये आर्थिक तडजोड झाली आहे. याचबरोबर शिक्षकांची फरक बिले प्रलंबित ठेवून त्यांच्यावर अन्याय केला आहे. आपण असे करत असल्याचे समोर आल्यामुळेच तर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांना आपली खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, चव्हाण हे धुतल्या तांदळासारखे कसे स्वच्छ आहेत, हे दाखविण्यासाठी त्यांनी काही शिक्षकांना हाताशी धरून जावळी तालुक्यात विद्यार्थ्यांना दोन कोटींचे किट वाटप केल्याची माहिती निवेदनाच्या माध्यमातून शिक्षण समिती सभापती अमित कदम यांना देत आहेत. मात्र, एका सामाजिक संस्थेने राबविलेल्या या उपक्रमाला स्वत: चव्हाण यांनीच विरोध केला होता, ही बाब स्वत: सभापती अमित कदमही विसरले आहेत. संबंधित संस्थेने तत्कालीन पालकमंत्री शशिकांत शिंदे आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे तक्रार झाल्यानंतर चव्हाण यांना शांत बसावे लागले होते. (प्रतिनिधी)
गाढवे, शिंदेंचा आदर्श घ्या...
जावळीचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी दिवंगत सी. एम. गाढवे आणि एल. एल. शिंदे यांनी शिष्यवृत्तीचा ‘जावळी पॅटर्न’ देशपातळीवर चमकविला. मात्र, त्यांनी हे करत असताना कधी स्वत: केलेल्या कामाचे श्रेय घेतले नाही. त्यांचा आदर्श गटशिक्षणाधिकारी चव्हाण यांनी घ्यावा, एवढीच आमची विनंती असल्याचे पत्रकात म्हटले आहे. पत्रकात म्हटले आहे की, गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांचे मात्र उलट आहे. ते दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय स्वत:च घेत आहेत आणि काही केंद्रप्रमुख तसेच शिक्षकांना ते स्वत:ची टीमकी वाजविणारे निवेदन शिक्षण सभापती अमित कदम यांना द्यावयास लावले आहे. जावळी तालुक्यातील एका सामाजिक संस्थेने जावळी तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी दोन कोटींचे किट वाटप केले. दरम्यान, हे किट वाटप करतेवेळी गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी यास विरोध केला होता. संबंधित संस्थेने हे प्रकरण तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे नेले. यानंतर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी चव्हाण यांना ‘रामास्वामी बाणा’ दाखविला होता.
सोमवारी आंदोलन
गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करून पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील काही शिक्षक काम एका शाळेवर करतात आणि पगार दुुसऱ्या शाळेवरील हजेरीपत्रकावर सह्या करून घेतात. दि. ८ डिसेंबर रोजी कोणत्याही महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी नसताना तालुक्यातील सर्व शाळा सकाळच्या वेळी भरविल्या आणि याचदिवशी शिक्षकांचा एक कार्यक्रम मेढा येथे आयोजित करून त्यास राजकीय स्वरूप देण्यात आले. ही बाब गंभीर आहे. यावर कारवाई झालीच पाहिजे, यासाठी सोमवार, दि. १५ रोजी मेढा आणि सातारा येथे शिक्षण समिती सभापती अमित कदम आणि शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.