Illegal mum excavation in village panchayat premises: village steward unknown | वेळे ग्रामपंचायतीच्या जागेत अवैध मुरूम उत्खनन : गाव कारभारी अनभिज्ञ
वेळे ग्रामपंचायतीच्या जागेत अवैध मुरूम उत्खनन : गाव कारभारी अनभिज्ञ

ठळक मुद्देअवैधरित्या शासकीय जागेत उत्खनन केलेप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. 

अभिनव पवार
सातारा -- वेळे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेतून तिऱ्हाईताने स्वतः च्या पोकलेन मशीन व डंपरचा वापर करून ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून मुरूम उत्खनन केला व परस्पररित्या त्याची विक्री केली. हे प्रकरण रविवारी सकाळी सजग नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे याचा पोलखोल झाला.

वेळे येथील माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या मालकीच्या पोकलेन व डंपरच्या साहाय्याने हा मुरूम काढला जात होता. ग्रामपंचायतीची ही मिळकत सध्या गायरान म्हणून अस्तित्वात आहे. वेळे ते भिलारेवाडी या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीने संबंधित रोड कंत्राटदाराला या जागेतून मुरूम नेण्याची परवानगी दिली. याच्या बदल्यात ग्रामपंचायत हद्दीतील इतर कच्चे रस्ते दुरुस्त करण्यासाठी येथील मुरूम वापरण्यास याच रोड कंत्राटदाराला सांगण्यात आले होते. वेळे ते भिलारवाडी या रस्त्याचे मुरुमीकरण सध्या पूर्णपणे बंद आहे. तर शेवटच्या टप्प्यात या रस्त्यासाठी मुरुमाची आवश्यकता भासेल. असे रोड कंत्राटदाराने सांगितले.

वेळे ग्रामपंचायतीच्या या गायरान जागेत डंपिंग ग्राउंड तयार करण्याचे असून त्यासाठी या जागेत मोठा खड्डा काढायचा आहे. याबाबत ग्रामपंचायतीमार्फत तसे ठरविण्यात आले आहे. मात्र त्याचे मोजमाप व त्याबाबतची निविदा ग्रामपंचायतीने अजून काढली नाही. त्यामुळे रविवारी जे मुरूम उत्खनन केले गेले ते पूर्णत: बेकायदेशीर आहे. याबाबत सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना विचारले असता त्यांनीही याबाबत आपणास काही कल्पना नसल्याचे सांगितले. 

माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार यांनी या जागेतील मुरूम उत्खनन करून तो २००० रूपये प्रति डंपर या दराने विक्री केल्याचे उघडकीस आले. हा अवैधरित्या चाललेला गोरखधंदा सरपंच व उपसरपंच यांनादेखील माहिती नव्हता की त्याबाबत सोयीस्कर रित्या जाणीवूर्वक दुर्लक्ष केले जात होते अशी शंका नागरिकांना पडू लागली आहे. 

उत्खनन करून विक्री केलेल्या मुरूमाची जितकी किंमत घेतली गेली; ती रक्कम व तितक्याच रकमेचा दंड ग्रामपंचायतीने वसूल करावा व अवैधरित्या शासकीय जागेत उत्खनन केलेप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. 

 

सदर गायरान जागेत डंपिंग ग्राउंड करायचे असून त्यासाठी येथे खड्डा करायचा आहे. त्यातून निघणारा मुरूम कोणाला हवा असल्यास तो मिळेल. परंतु परस्पर कोणीही मुरूम चोरून नेत असेल व विक्री करीत असेल तर ते योग्य नाही. मुरूम कधी , कोणी व कुठे नेला याबाबत मला अजिबात कल्पनाही नव्हती. याचा खुलासा झालेवर संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करू.
 .    .....रफिक इनामदार, सरपंच, वेळे

Web Title: Illegal mum excavation in village panchayat premises: village steward unknown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.